हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला आणि या मोहिमेची यशस्वी सुरुवात केली. पाकिस्तानने ठेवलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ चेंडूंत पूर्ण केले. गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सनी मात केली होती. कोणत्याही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतावर मिळविलेला तो पहिला विजय ठरला होता. पण त्याचा आनंद टिकला नाही. भारताने आशिया कपमध्ये परतफेड केली आहे.
हार्दिकने ३३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकातील ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना हार्दिकने लाँग ऑनला षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने गोलंदाजीतही कमाल केली आणि ३ बळी मिळविले.
दुबईत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १४७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून कामगिरी केली त्यामुळे पाक फलंदाजांना लगाम घालण्यात त्यांना यश आले. त्यांचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (४३) वगळता इतर फलंदाजांना वैयक्तिक ३० धावाही करता आल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचा डाव १४७ धावांत आटोपला. अनुभवी भुवनेश्वर कुमारने २६ धावांत ४ बळी घेतले. अर्शदीपने ३३ धावांत २ तर आवेश खानने १९ धावांत १ बळी घेतला. हार्दिकने ३ बळी घेताना २५ धावा दिल्या.
हे ही वाचा:
‘विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’
काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार
आता महाराष्ट्रातील ट्विन टॉवर पडणार
पाकिस्तानच्या या धावसंख्येला उत्तर देताना कर्णधार रोहित शर्माला सलामीवीर म्हणून यश लाभले नाही. तो १२ धावा करून तंबूत परतला. तर के.एल. राहुल भोपळाही फोडू शकला नाही. तरीही रोहित आणि विराट कोहली (३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यावर विराटही झटपट माघारी परतला. सूर्यकुमारसह (१८) रवींद्र जाडेजाने ३६ धावा जोडल्या. मग सूर्यकुमारही बाद झाला. नसीम शहाने त्याला त्रिफळाचीत केले. हार्दिकने त्यानंतर तडाखेबंद खेळ करताना १७ चेंडूंत ३३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यामुळे भारताने १९.४ षटकांतच निर्धारित लक्ष्य गाठले.
स्कोअरबोर्ड
पाकिस्तान १९.५ षटकांत १४७ (मोहम्मद रिझवान ४३, इफ्तिकार अहमद २८, भुवनेश्वर २६-४, हार्दिक २५-३, अर्शदीप ३३-२) पराभूत वि. भारत १९.४ षटकांत ५ बाद १४८ (विराट कोहली ३५, रवींद्र जाडेजा ३५, सूर्यकुमार १८, हार्दिक नाबाद ३३, मोहम्मद नवाझ ३३-३, नसीम शहा २७-२)