हरमनप्रीत सिंगचा १५०वा गोल, भारताने मलेशियाला केले पराभूत

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी

हरमनप्रीत सिंगचा १५०वा गोल, भारताने मलेशियाला केले पराभूत

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत रविवारी मलेशिया विरुद्धच्या एकतर्फी लढतीत ५-० असा विजय मिळवला. भारताने या विजयासह आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकात सात गुणांसह पहिल्या स्थानावर धडक मारली. मलेशियाचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.    

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरपासूनच आघाडी घेत चारही क्वार्टरमध्ये गोल करत भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला. या खेळीने मलेशियाची विजयाकडे जाणारी वाटचाल रोखली. भारताच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. यासोबतच कार्ती सेल्वम, हार्दिक सिंग, गुर्जंत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताला दिमाखदार विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. सेल्वमने १५ व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३२ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दमदार गोल केला.  

हरमनप्रीतने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल केला आणि हाच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळातील १५० वा गोल ठरला. गुर्जंत सिंगने ५३ व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताच्या गोलचा चौकार मारला. शेवटी ५४ व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये केंद्राकडून अतिरिक्त ८०० जवान रवाना

सरकार जिंकले; दिल्ली सेवा विधेयक १३१ वि. १०२ मतांनी संमत

राजस्थान बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी मारली चितेत उडी

पतीच्या जेवणात जडीबुटी कालवली, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल  

पाकिस्तान-जपान यांच्यामधील लढत बरोबरीत  

दरम्यान पाकिस्तान-जपान यांच्यामध्ये झालेली अन्य लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. यामुळे या दोन्ही देशांना या स्पर्धेमध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान व जपान या दोन्ही देशांना प्रत्येकी तीन लढतींनंतर दोन गुणांवरच समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही देशांच्या दोन लढती अनिर्णित राहिल्या असून एका लढतीत त्यांचा संघ पराभूत झाला आहे. पाकिस्तानकडून राणा अब्दुल, मुहम्मद खान यांनी दमदार गोल केले. जपानकडून सेरेन तनाका, आरयोसेई कातो व मसाकी ओहाशी यांनी शानदार गोल केले.    

गतविजेत्या दक्षिण कोरियाला रोखण्यात चीनला यश

दक्षिण कोरिया-चीन यांच्यामध्येही लढत पार पडली. या लढतीत गतविजेत्या दक्षिण कोरियाला रोखण्यात चीनला यश मिळाले. चीनने दक्षिण कोरियाला १-१ अशा बरोबरीत रोखले.

Exit mobile version