आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘शतक’

भारताने प्रथमच जिंकली १०० पदके

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘शतक’

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक नवे विक्रम रचले आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. भारताने प्रथमच अशी कामगिरी केली आहे. भारताच्या महिला कबड्डी संघाने सुवर्ण पदकावर नाव कोरले. यानंतर भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० आणि सुवर्ण पदकांची संख्या २५ झाली आहे.

तैवान विरुद्ध झालेल्या कबड्डी अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी तैवानला २६ – २५ अशा फरकाने हरवलं. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय संघाने १४ – ९ अशी आघाडी घेतली होती. सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. तरीही अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. एका गुणाच्या फरकाने भारतीय संघाने पदक कमावले.

या पदकासह भारताने यंदाच्या आशियाई स्पर्धेत १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये २५ सुवर्ण पदक, ३५ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत नऊ खेळांमध्ये कमीत कमी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. यातील सर्वाधिक सात सुवर्ण पदक शूटिंगमध्ये मिळाले आहेत. तर, अ‍ॅथलेटिक्समध्ये सहा सुवर्ण पदक मिळाले आहेत. आता पुरूष कबड्डी संघ आणि पुरूष क्रिकेट संघाचे अंतिम सामने रंगणार असून भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर होणार आहे.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

अबकी बार १०० पार असं लक्ष्य घेऊन यंदा भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेमध्ये उतरले होते. हे लक्ष्य भारताने गाठलं आहे. १९५१ पासून ही स्पर्धा खेळली जात आहे. तेव्हापासून ते २०२३ पर्यंत भारताने पहिल्यांदाचं १०० पदकांचा आकडा गाठला आहे. याआधी २०१८ मध्ये भारताने आशियाई स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ७० पदके जिंकली होती.

Exit mobile version