नौकानयन स्पर्धेत भारताची रौप्यपदकाची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचे पहिले पदक

नौकानयन स्पर्धेत भारताची रौप्यपदकाची कमाई

चीनमध्ये सध्या आशियाई स्पर्धेचा थरार रंगला असून आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. नौकानयन स्पर्धेत भारताने बाजी मारली असून नेहा ठाकूर हिने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचे हे पहिले पदक आहे. भारताने आतापर्यंत एकूण १२ पदके जिंकले आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने दोन सुवर्णांसह ११ पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा असणार आहे.

नेहा ठाकूर हिने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. नेहा हिने सुरुवातीला अडखळत सुरुवात केली असली तरी तिने योग्य खेळ करत वेळ गाठून १० व्या शर्यतीनंतर दुसऱ्या स्थानावर जाऊन उल्लेखनीय सुधारणा केली.

नेहा ही मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याची मुलगी आहे. ती देवास जिल्ह्यातील हातपिपलिया तहसीलमधील अमलताज गावची रहिवासी आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये नेहा ठाकूर आणि रितिका डांगी यांनी अबुधाबी येथे झालेल्या आशियाई सेलिंग चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे कांस्यपदक आणि सुवर्णपदक जिंकले होते. तेथील उल्ल्खेनीय कामगिरीमुळेच त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास मदत झाली.

दुसरीकडे, तुलिका मान ज्युदोमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचली असून येथे विजय मिळवून ती कांस्यपदक जिंकू शकते. तुलिका मानने तिची रिपेचेज फेरी चायनीज तैपेईच्या जिया वेन त्साय विरुद्ध इप्पॉनने जिंकली आणि महिलांच्या +७८ किलो गटात कांस्यपदकाच्या सामन्यात प्रवेश केला.

हे ही वाचा:

काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !

२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार गोल केले. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. भारताचा पुढचा सामना जपानशी असणार आहे.

Exit mobile version