भारतीय दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडची आणि भारताची तिसरी कसोटी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली. या संपूर्ण कसोटी सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. केवळ दुसऱ्याच दिवशी भारताने खेळ संपवून इंग्लंडवर तब्बल दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
हे ही वाचा:
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यापैकी केवळ झॅक क्रॉवली याला ५३ इतकी सर्वोच्च धावसंख्या नोंदवता आली. त्यानंतर जो रूट (१७), बेन फोक्स (१२) आणि जोफ्रा आर्चर (११) एवढ्याच धावा करू शकले, बाकी कोणत्याही खेळाडूला मैदानात फार काळ टिकून राहणे जमले नाही. त्यामुळे केवळ ११२ धावाच धावफलकावर लागू शकल्या. या दिवसावर भारतीय फिरकीपटूंचा दबदबा पहायला मिळाला. अक्षर पटेलने २१.४ षटकांत तब्बल ६ विकेट मिळवल्या तर रविचंद्रन अश्विनने ३ आणि इशांत शर्माने १ विकेेट मिळवली.
भारताने त्याच दिवशी लक्ष्याचा पाठलाग करायला सुरूवात केली. मात्र शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली देखील स्वस्तात बाद झाले. त्यानंतर दिवस संपायच्या काही वेळ आधीच अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सर्वोच्च धावसंख्या रोहित शर्माने (६६) उभारली. दुसऱ्या दिवसापर्यंत तो फलंदाजी करत होता. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी देखील १४५ धावांवर आटपली. त्यामुळे भारत केवळ ३३ धावांचे लक्ष्य देऊ शकला.
या धावांचा पाठलाग करतानादेखील इंग्लंडची चांगलीच दमछाक झाली. या डावात तर भारताने जलदगती गोलंदाजांचा वापर केलाच नाही. संपूर्ण गोलंदाजीची धुरा फिरकीपटूंनी सांभाळली, आणि यशस्वीपणे पेलून दाखवली. अक्षर पटेलने पुन्हा एकदा एकहाती ५ विकेट बळकावून निम्मा इंग्लिश संघ गारद केला, तर रविचंद्रन अश्विनने ४ बळी मिळवले. वॉशिंग्टन सुंदरने पुरते एक षटकही टाकले नाही, परंतु शेवटच्या गड्याला बाद करून सुंदरने केवळ ८१ धावांवर इंग्लंडच्या डावाची समाप्ती केली.
कमी धावांवर खेळ संपल्याने भारतासमोर विजयासाठी केवळ ४९ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य रोहित शर्मा आणि शुभमन गिलनेच पूर्ण केले. त्यामुळे भारताने या सामन्यावर सहजपणे विजयाची मोहर उमटवली.