भारताने बांगलादेशविरोधातील पहिली कसोटी मोठ्या फरकाने जिंकली. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या भारताच्या इतिहासात पराभवांपेक्षा विजयांची संख्या या विजयामुळे अधिक झाली आहे. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक आहे.
भारताने बांगलादेशविरुद्धची ही कसोटी २८० धावांनी जिंकली. आतापर्यंत भारताच्या खात्यात ५८० कसोटी सामने आहेत. त्यापैकी १७९ विजय भारताने मिळविले आहेत तर पराभवांची संख्या आहे १७८. २२२ सामने भारताने अनिर्णीत राखले आहेत तर एक सामना टाय झालेला आहे.
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खात्यात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पराभवांपेक्षा विजयांची संख्या अधिक आहे. बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यात कर्णधार नजमूल हुसेन शांतो याने ८२ धावांची खेळी केली आणि तो एकमेव लढवय्या ठरला. पण त्याच्या इतर सहकाऱ्यांकडून त्याला हवी तशी साथ मिळाली नाही.
या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या आणि आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आर. अश्विनने पाच बळी घेत बांगलादेशचा खेळ गुंडाळला. त्याची ही पाच विकेट घेण्याची ३७वी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली तसेच न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली यांच्या ३६ वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम त्याने मागे टाकला.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान अमेरिकेकडून तस्करी झालेल्या २९७ मौल्यवान कलाकृती भारताला परत!
पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?
आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल
भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. त्यात अश्विनने ११३ धावांची खेळी केली होती. त्याला उत्तर देताना बांगलादेशचा डाव १४९ धावांत आटोपला होता. दुसऱ्या डावात भारताच्या ऋषभ पंतने १०९ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने नाबाद ११९ धावा केल्या त्यामुळे भारताने ४ बाद २८७ धावा करत डाव घोषित केला. बांगलादेशला पाचशेपेक्षा अधिक धावा करण्याचा आव्हान होते. ते पार करण्याच्या प्रयत्नात त्यांचा डाव २३४ धावांत आटोपला. अश्विनने या डावात ८८ धावांत ६ बळी घेतले तर रवींद्र जाडेजाने ५८ धावांत ३ बळी घेतले.
भारताने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.