भारताने आपल्या दमदार आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८मध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडेल. ऑस्ट्रेलियाचे मात्र या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानने जर २५ जूनला होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येईल.
अमेरिकेतील ग्रॉस आयल येथे झालेल्या या सामन्यानंतर भारताच्या खात्यात ६ गुण जमा झाले असून भारताने आपल्या गटात अव्वल स्थान मिळविले.
कर्णधार रोहित शर्माने ४१ चेंडूंत ९२ धावांची झंझावाती खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले. पण ते पार करताना ऑस्ट्रेलियाला २४ धावा कमी पडल्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्राविस हेडने ७६ धावांची खेळी केली पण ऑस्ट्रेलियाला निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही. अर्शदीप सिंगचे तीन बळी, कुलदीप यादवचे २ बळी या जोरावर भारताने हा विजय मिळविला.
अफगाणिस्तानने शनिवारी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला शून्यावर बाद करत दमदार सुरुवात केली होती पण रोहित शर्माने तडाखेबंद फलंदाजी करत सगळे चित्रच बदलून टाकले. रोहितने स्टार्कच्या एकाच षटकात चार षटकार लगावत २९ धावांची लूट केली. या स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावताना त्याने १९ चेंडूंत ही खेळी पूर्ण केली. रोहित शर्माच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्ती!
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
आम्ही ती चूक का करू, म्हणत केजरीवाल यांना ‘सर्वोच्च’ दणका
पुणे ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित !
सूर्यकुमार यादव (३१), शिवम दुबे (२८), हार्दिक पंड्या (२७) यांच्यामुळे या स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ २०० चा टप्पा ओलांडू शकला.
त्यानंतर अर्शदीपने डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात बाद करून धक्का दिला. पण ट्राविस हेड आणि मिचेल मार्श यांनी ८१ धावांची भागीदारी करत आणखी पडझड होऊ दिली नाही. कुलदीपने ही जोडी फोडली आणि नंतर मात्र एवढी मोठी भागीदारी कांगारू करू शकले नाहीत.