अवघ्या ९५व्या सेकंदात पाकिस्तानने गोल करत भारताला धक्का दिला खरा पण तो गोल अमान्य केल्यानंतर भारतीय संघाने आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर ४-० अशी मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले. आता भारताची उपांत्य फेरीत जपानशी गाठ पडेल तर दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत झुंजतील.
महापौर राधाकृष्णन स्टेडियम, चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात भारताला ९५ व्या सेकंदात धक्का बसला पण हनन शाहिदचा तो गोल पंचांनी अमान्य केला. त्यानंतर भारतीय संघाने स्वतःला सावरले. त्यानंतर पुढील १२ मिनिटे दोन्ही संघांनी एकमेकांची परीक्षा पाहिली. पण पहिल्या क्वार्टरच्या अंतिम क्षणात भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यात हरमनप्रीतने आपल्या दोन गोलपैकी एक गोल नोंदविला.
हे ही वाचा:
‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता
पुण्यातील दहशतवाद प्रकरणाचा तपास एनआयए करणार
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षिकेनेच घातला गणवेशात
‘सर्वोच्च, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी मालमत्ता जाहीर करावी’
त्यानंतर २३व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक गोल मारत भारताची स्थिती मजबूत केली. जुगराज सिंगने तिसऱ्या क्वार्टरच्या सहाव्या मिनिटाला भारताची आघाडी ३-० अशी वाढविली. आकाशदीपने नंतर मनदीप सिंगच्या पासवर गोल करत भारताला ४-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली. ही स्थिती सामना संपेपर्यंत कायम राहिली.
पहिल्या काही सेकंदांत केलेला गोल अमान्य केल्यानंतर पाकिस्तानचे सहप्रशिक्षक रेहान बट यांनी त्याबद्दल नाराजी प्रकट केली. पण या गोलच्या सहाय्याने भारतावर दबाव ठेवण्यात आपल्याला यश आले असते. या विजयानंतर भारतीय संघ आनंद साजरा करत होता. खेळाडू सेल्फी काढून आपला आनंद व्यक्त करत होते. गोलरक्षक श्रीजेशनेही स्टेडियममधील लोकांसह छायाचित्रे घेतली.