भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !

जुगराज सिंगचा विजयाचा ठरला गोल 

भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !

भारतीय हॉकी संघाने मंगळवारी (१७ सप्टेंबर) उत्कृष्ट कामगिरी करत चीनचा १-० असा पराभव करत ५व्यांदा  आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा ताज जिंकला. दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेर ५१ व्या मिनिटाला जुगराज सिंगने निर्णायक गोल करून भारताला विजय मिळवून दिला.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया असा काल (१६ सप्टेंबर) सामना रंगला. मात्र, भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. तशीच कामगिरी करत आज भारतीय संघाने चीनला नमवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्ण, चीनला रौप्य तर पाकिस्तानला कांस्य पदक मिळाले आहे.

हे ही वाचा : 

महिलांना नाईट शिफ्ट देण्याचे टाळून पळ काढू नका; त्यांना सुरक्षा देणं सरकारचे कर्तव्य

काँग्रेसची इकोसिस्टम खवळली, ‘सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या’

आतिशी यांचे आई-वडील दहशतवादी अफझल गुरूची फाशी रोखण्यासाठी लढले !

बांगलादेशातील अस्थिरतेच्या काळात हिंदूंना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो

दरम्यान, भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पाचव्यांदा जिंकली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली. भारताने सर्वात पहिल्यांदा २०११ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर २०१६ मध्येही भारताने पाकिस्तानला हरवून ही ट्रॉफी जिंकली होती. २०२३ मध्ये अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि आता विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे.

Exit mobile version