केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाशी संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर दोन आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड बरोबर एक करार केला. हे तिन्ही संरक्षण खरेदी व्यवहार सुमारे ५,४०० कोटी रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गाझियाबाद बरोबर ऑटोमेटेड एअर डिफेन्स कंट्रोल आणि रिपोर्टिंग सिस्टिमच्या खरेदीसाठी पहिला करार करण्यात आला आहे. “प्रोजेक्ट आकाशीर” नावाची ही उपकरणे लष्करासाठी आहेत. ही उपकरणे १,९८२ कोटी रुपयांना खरेदी केली जाणार आहेत. सारंग इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर प्रणालीच्या खरेदीसाठी याच कंपनीने हैदराबाद बरोबर दुसरा करार केला आहे.
नौदलासाठीच्या उपकरणांसाठी ४१२ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. जीसॅट ७ बी हा आधुनिक संचार उपग्रह तयार करण्यासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड बरोबर करार झाला आहे. या २,९६३ कोटी रुपये किमतीच्या उपग्रहामुळे भारतीय लष्कराला दळणवळणाच्या अनेक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक सरकारी संस्था आहे.
हे ही वाचा:
गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी
भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन
करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या
भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीला भारत सरकारकडून ६,८२८ कोटी रुपयांच्या खरेदी ऑर्डर मिळाल्या आहेत. या रकमेतून कंपनी एचटीटी – ४० जातीच्या ७० विमानांची निर्मिती करणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कराराला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या खरेदी आदेशामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे.