आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेचा थरार लवकरच क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शुक्रवार ४ मार्चपासून आयसीसी महिला वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ४ मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा ३ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज असे आठ संघ असून स्पर्धेत ३१ सामने होतील. स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. भारत या स्पर्धेत साखळी फेरीत सात सामने खेळणार आहे. भारतीय महिला संघाची पहिली लढत रविवार, ६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने सकाळी ६.३० वाजता सुरू होतील.
भारताचे आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेमधील सामने –
- ६ मार्च- भारत विरुद्ध पाकिस्तान, बे ओव्हल
- १० मार्च- भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन
- १२ मार्च- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
- १६ मार्च- भारत विरुद्ध इंग्लंड, माउंट माउंगानुई
- १९ मार्च- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलँड
- २२ मार्च- भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन
- २७ मार्च- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्राइस्टचर्च
भारतीय महिला संघाने आतापर्यंत आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेमध्ये दोन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, भारताला अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. भारताने २००५ मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. २०१७ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातही भारताचा पराभव झाला. आतापर्यंत सर्वाधिक ६ विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने मिळवले आहेत. तर इंग्लंडने चार वेळा तर न्यूझीलंडने एकदा जेतेपद मिळवले आहे. आयसीसी महिला वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला १.३२ मिलियन अमेरिकन डॉलर (१० कोटी रुपये) इतकी रक्कम मिळणार आहे.