जपानकडून सहा बुलेट ट्रेन खरेदी करणार!

या महिन्यात कराराला अंतिम स्वरूप

जपानकडून सहा बुलेट ट्रेन खरेदी करणार!

भारत या महिन्याच्या अखेरपर्यंत जपानकडून येणाऱ्या पहिल्या सहा ई५ मालिकेतील बुलेट ट्रेनच्या खरेदीच्या व्यवहारावर शिक्कामोर्तब करेल. त्यामुळे सन २०२६मध्ये जून-जुलै महिन्यात गुजरातमध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरू होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत रेल्वे आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या खरेदीसह अन्य वस्तूंसाठी निविदा जाहीर करेल.

अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानच्या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन कॉरिडोरमध्ये ‘सीमीत स्टॉप’ आणि ‘ऑल स्टॉप’ सेवा असतील. सीमीत स्टॉपमधील सेवेत मुंबई आणि अहमदाबादमधील अंतर केवळ दोन तासांत पार केले जाईल. तर, दुसऱ्या सेवेसाठी हेच अंतर दोन तास ४५ मिनिटांत कापले जाईल.

हे ही वाचा :

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

डीआरआयची कारवाई; मुंबईतून २४ किलो सोनं जप्त

सीरियामध्ये दहशतवाद्यांचा गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार; १८ जणांचा मृत्यू

ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स

जानेवारीपर्यंत या प्रकल्पाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये या प्रकल्पाचे काम ४८.३ टक्के पूर्ण झाले आहे. तर, महाराष्ट्रात केवळ २२.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या एक वर्षात विविध नद्यांवरील सहा उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. गुजरातमध्ये एकूण २० पूल होणार असून त्यातील सात पूर्ण झाले आहेत. ‘या महिन्यात महाराष्ट्रातील कामाने चांगला वेग घेतला. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत जमीन संपादनाचे आणि ती जमीन प्रकल्पासाठी सुपूर्द करण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत,’ असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘महाराष्ट्रातील गेल्या सरकारमुळे खूप वेळ वाया गेला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी काम करण्याकरिता आम्ही उत्सुक आहोत,’ असे एका सूत्राने सांगितले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या रखडपट्टीला उद्धव ठाकरे यांचे तत्कालीन सरकार कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला होता. त्यांनी याबाबत लवकर मंजुरी दिली असती तर हे काम आणखी प्रगतिपथावर असते, असे त्यांनी म्हटले होते. बुलेट ट्रेनमुळे आर्थिक प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-अहमदाबाद यांच्यातील ५०८ किमीचा बुलेट ट्रेन मार्गापैकी सूरत-बिलिमोरा टप्पा जुलै-ऑगस्ट २०२६पर्यंत सुरू होऊ शकतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

Exit mobile version