‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’

‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महिनाभरानंतर होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुपचे (फॉक्सकॉन) अध्यक्ष आणि सीईओ यंग लिऊ यांनी पुन्हा एकदा भारताच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. ‘भारत देश हा जगातील नवीन उत्पादन केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी सज्ज आहे. तसेच, पुरवठादारांची साखळी तयार करण्यासाठी चीनमध्ये जितका वेळ लागला, त्यापेक्षा अधिक वेगाने हा विकास होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘ग्राहकांच्या गरजेनुसार फॉक्सकॉन भारतातील आपल्या उद्योगाचा विस्तार करेल. फॉक्सकॉनने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन भारतातील आपला कार्यविस्तार वाढवण्यास सुरुवात केलीच आहे,’ असे अध्यक्षांनी तैवानमधील एका निवेदनात सांगितले. ते कंपनीच्या भारतातील वाढीसाठीच्या योजनांची रूपरेषा सांगत होते.

जर भारतात फारसे बदल झाले नाहीत तर देश जगासाठी ‘नवे उत्पादन केंद्र’ बनेल. तसेच, पुरवठा साखळी तयार करण्यासाठी चीनमध्ये ३० वर्षांचा कालावधी लागला, मात्र भारतात ती अधिक वेगाने विकसित होण्याची शक्यता आहे, विशेषत: स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी येथे मोठ्या संधी आहेत,’ असे त्यांनी अधोरेखित केले. फॉक्सकॉनच्या अध्यक्षांनी उत्पादनाच्या बाबतीत भारत आणि तैवान यांच्यातील वाढत्या संबंधांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘जिथे इच्छा असते, तिथे मार्ग निघतो. मी भारत सरकारचा दृढनिश्चय अनुभवू शकतो. त्यांच्या प्रगतीबाबत मी खूप आशावादी आहे. पंतप्रधान मोदींनी मला एकदा सांगितले की, ‘आयटी’ म्हणजे भारत आणि तैवान. पंतप्रधान महोदय, तैवान तुमचा सर्वांत विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदार आहे आणि भविष्यातही राहील. चला, हे एकत्र करूया,’ असे आवाहन त्यांनी जुलैच्या अखेरीस गांधीनगर येथे झालेल्या सेमीकंडक्टर परिषदेत केले होते.

हे ही वाचा:

पंतप्रधानांची ‘सनातन धर्मा’च्या संरक्षणाची हाक

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

आम आदमी पक्षाने पंजाबात इंडी अलायन्सवर घातला घाव

फॉक्सकॉन ही कंपनी सन २००५ पासून भारतात आहे, आणि आता स्मार्टफोन आणि टेलिव्हिजन, तसेच इलेक्ट्रिक वाहनांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागणीत वाढ करण्यासाठी मोठा विस्तार करण्याची मोहीम कंपनीने सुरू केली आहे. फॉक्सकॉन ही कंपनी ऍप्पलची सर्वाधिक उत्पादने बनवते. त्यांची कंपनी भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणेल आणि ३० हून अधिक कारखाने स्थापन करेल. त्यांची उलाढाल सुमारे १० अब्ज अमेरिकी डॉलर असेल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version