भारत लवकरच केवळ इथॅनॉल सारख्या स्थानिक इंधनांवर चालणाऱ्या इंजिनांना परवानगी देणार आहे. त्यामुळे वाहने पेट्रोल, डिझेल सारख्या खनिज तेलांवर चालणाऱ्या इंधनाऐवजी इथॅनॉलवर चालतील. पुढील तीन महिन्यात भारत याबाबतची योजना स्पष्ट करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी यांनी सांगितल्यानुसार ब्राझिल, अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये फ्लेक्स इंजिने आधीपासूनच अस्तित्त्वात आहेत आणि बीएमडीब्ल्यु, मर्सिडिज आणि टोयोटा यां आघाडीच्या वाहन उत्पादकांनी या प्रकारच्या इंजिनांचे उत्पादन करायला सुरूवात केली आहे.
मंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या इंधनामुळे देशाला फायदा होणार आहे. सध्या भारत मोठ्या प्रमाणात खनिज तेलांवर अवलंबून आहे. ते अवलंबित्त्व स्थानिक पातळीवरील इथॅनॉलसारख्या इंधनावर गेल्यास, ते कमी प्रदुषणकारी असेल त्याबरोबरच भारतावरील खनिज तेलांचा ताण कमी होण्यास मदत होईल.
हे ही वाचा:
परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर
कॉलेजच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये पॉर्न व्हिडीओने उडवला गोंधळ
पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!
भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
इथॅनॉलची किंमत देखील अतिशय कमी असल्याचे त्यांनी सांगितले. इथॅनॉल ६०-६२ रुपये प्रति लिटर इतक्या कमी दरात उपलब्ध आहे. त्याचा फायदा देखील अनेक वाहनधारकांना होणार आहे. त्याबरोबरच मंत्रीमहोदयांनी इथॅनॉलमधून मिळणारी उर्जा काही प्रमाणात कमी असल्याचे देखील कबूल केले. जगातील अनेक देशांत फ्लेक्स इंजिनांचा वापर आधीपासूनच होत असून त्याचे अनेक चांगले फायदे त्या देशांना मिळत असल्याचे सांगून, एक वाहतूक मंत्री या नात्याने देशातील सर्वांसाठी इथॅनॉल उपलब्ध करून देण्याचे ठरवले असल्याचे सांगितले.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार लवकरच १०० टक्के केवळ इथॅनॉलचे पंप उभारण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या दोन पंपांचे उद्घाटन पुण्यात केले. त्याबरोबरच टाटा आणि बजाज सारख्या अनेक भारतीय वाहन उद्योजकांनी देखील इथॅनॉलवर चालणाऱ्या इंजिनांच्या निर्मितीला सुरूवात केली आहे.
त्याबरोबरच या प्रकारच्या वाहनांच्या खरेदीसाठी सुलभ कर्ज मिळावे यासाठी एक व्यवस्था उभी करण्याबाबत देखील गडकरी यांनी सुचना दिल्या आहेत. कर्जवाटपासाठी अतिशय मजबूत अशी व्यवस्था निर्माण करून त्या आधारे लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना कर्जवाटप करण्याच्या सुचना देखील गडकरी यांनी दिल्या.