भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान सुरू असलेली पाच सामन्यांची टी २० मालिका रंगतदार वळणावर असताना पावसाच्या हजेरीमुळे चाहत्यांची निराशा झाली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना रविवार, १९ जून रोजी बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन दोन सामने जिंकून या टी-२० मालिकेत बरोबरी साधली होती. मात्र, शेवटचा सामना रद्द झाल्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली आहे.
शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खेळाडू मैदानात उतरल्याबरोबरच पाऊस सुरू झाला. त्यावेळी ४५ मिनिटे खेळ थांबला गेला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सलामीवीर ईशान किशन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडही बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. त्यावेळी भारताचा धावफलक २ बाद २८ असा होता.
पावसाची थांबण्याची चिन्हे न दिसताच शेवटी ही लढत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी पाहिले दोन टी २० सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत उर्वरित दोन्ही सामने जिंकून २-२ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे कालचा शेवटचा सामना निर्णायक ठरणार होता. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला.
हे ही वाचा:
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!
‘अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन उचकावण्यात काँग्रेसचा हात’
‘बाळासाहेबांचे विचार विसरलेले आमदारचं काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील’
तोडफोड करणाऱ्या तरुणांना ‘अग्निपथ’चा मार्ग बंद
चार सामन्यांमध्ये सहा बळी मिळवणाऱ्या भुवनेश्वर कुमारला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेच्या आधी कर्णधार के एल राहुल जखमी झाल्याने ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात पहिली टी- २० मालिका जिंकण्याची संधी ऋषभ पंतला होती. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे ही संधी हुकली. आता भारतीय टी- २० संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. तर, भारतीय कसोटी संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.