बेंगळुरू येथे सुरू असलेल्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने लॅबनॉनला शूटआऊटमध्ये ४-२ने पराभूत केले. गुरुप्रीतसिंग संधूच्या प्रभावी गोलरक्षणामुळे भारताला ही कामगिरी करता आली. आता जेतेपदासाठी भारताची लढत कुवेतशी होईल. हा सामना ४ जुलै रोजी रंगणार आहे. भारताचा संघ तेराव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयश आल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत खेळवला गेला. मात्र तरीही दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी झाली.
त्यामुळे अखेर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळवला गेला. लेबनॉनचा कर्णधार मातौक याने मारलेली किक रोखून गुरप्रीतसिंग संधूने भारताला छान सुरुवात करून दिली. कर्णधार सुनील छेत्री, अन्वर, महेश आणि उदांता यांनी त्यांना मिळालेल्या पहिल्या चार पेनल्टीचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचे रूपांतर गोलमध्ये केले. तर, लेबनॉनच्या वालिद शौर आणि मोहम्मद सादेक यांना यशस्वी गोल करता आला. लेबनॉनचे आव्हान राखण्यासाठी खलिल बादेर याला संघाच्या चौथ्या प्रयत्नात गोल करणे आवश्यक होते. मात्र बादेरच्या किकवर चेंडू गोलपोस्टपासून दूर गेला आणि भारतीय फुटबॉलप्रेमींनी एकच जल्लोष केला.
हे ही वाचा:
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”
तर, खास निमंत्रित असलेल्या कुवेतने बांगलादेशवर १-०ने मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने आंतरखंडीय स्पर्धेतील निर्णायक लढतीत लेबनॉनला हरवून जागतिक क्रमवारीत अव्वल १०० संघांत प्रवेश केला होता. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आठवेळा सॅफ चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले असून त्याला चारवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.