भारताला मिळणार ३१ प्रिडेटर ड्रोन; अमेरिकेशी ३२ हजार कोटींचा करार!
भारतीय लष्कराची हिंदी महासागरात ताकद वाढणार
Team News Danka
Published on: Tue 15th October 2024, 03:20 PM
भारतीय सैन्याची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे. भारताने अमेरिकेसोबत ३१ एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार केला आहे. दोन्ही देशांमधील या करारावर दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केली आहे. या कराराबाबत दोन्ही देशांमध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. हा करार ३२ हजार कोटी रुपयांचा आहे. परंतु वृत्तानुसार, डीलची एकूण किंमत ३४,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. या करारामुळे भारतीय सशस्त्र दलांची देखरेख क्षमता वाढणार आहे. संरक्षणविषयक कॅबिनेट समितीने गेल्या आठवड्यातच या कराराला मंजुरी दिली होती.
भारताने ३१ प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा करार गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान केला होता. या कराराच्या महत्त्वाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते की, या करारामुळे दोन्ही देशांमधील सामरिक तांत्रिक सहकार्य आणि लष्करी सहकार्यात लक्षणीय वाढ होईल. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, प्रीडेटर ड्रोन MQ-९B ताब्यात घेतल्याने हिंदी महासागरात भारतीय नौदलाची देखरेख शक्ती अनेक पटींनी वाढेल. अमेरिकन कंपनी जनरल ॲटोमिक्सनकडून हे प्रीडेटर ड्रोन खेर्डी करण्यात येणार आहेत. या करारांतर्गत मिळालेल्या ३१ प्रिडेटर ड्रोनपैकी भारतीय नौदलाला १५ ड्रोन मिळणार आहेत. तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी ८ ड्रोन मिळणार आहेत.
दरम्यान, चीन ज्या प्रकारे हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, ते पाहता भारतीय नौदलही आपली क्षमता वाढवत आहे. आता प्रीडेटर ड्रोन्स मिळाल्यानंतर नौदलाची ताकद लक्षणीय वाढणार आहे, कारण
हे प्रीडेटर ड्रोन सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. भारत आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. एका करारानुसार, भारताला अमेरिकेकडून ३१ प्रीडेटर ड्रोन मिळणार आहेत, तर दुसऱ्या करारानुसार, या ड्रोनची देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा देशात स्थापन केली जाणार आहे.
एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोन हे जगातील सर्वात धोकादायक ड्रोन आहेत. वैशिष्ट्य म्हणजे, ४४२ किलोमीटर ताशी वेगासह ड्रोन सुमारे ५०,००० फूट उंचीवर उडू शकते. हे ड्रोन हल्ल्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून हवेतून जमिनीवर अचूक हल्ले करण्यास सक्षम आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात विस्तारित मोहिमेवर पाठवण्याची ड्रोनची क्षमता हे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.
MQ-९B ड्रोन इंधन न भरता २,००० मैल उडू शकते आणि १,७०० किलो माल वाहून नेऊ शकते, ज्यामध्ये चार क्षेपणास्त्रे आणि सुमारे ४५० किलो बॉम्बचा समाविष्ट आहे. ड्रोनचे निर्माते जनरल ॲटोमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्सने दावा केला आहे की, हे ड्रोन नॉनस्टॉप उड्डाण करू शकतात किंवा ३५ तासांपर्यंत उड्डाण करू शकतात