येत्या काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीच्या बाबतीत पहिल्या स्थानी असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भारतामध्ये हरित ऊर्जा निर्मितीची मोठी क्षमता आहे. मला खात्री आहे की, आम्ही सहा महिन्यांत १०० टक्के लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याच्या स्थितीत असू. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान सुरू करण्याच्या दृष्टीने सरकार काम करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधील रासायनिक अभिक्रियेद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वाहनाचे इंजिन चालवण्यासाठी वापरली जाते. यासाठी खनिज इंधनाची आवश्यकता नाही.
गडकरी म्हणाले की, एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालविण्याची क्षमता असणाऱ्या इंजिनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वाहन उत्पादकांना प्रोत्साहित करू इच्छिते. या संदर्भात उत्पादकांशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. गडकरी म्हणाले की, ‘भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आगामी काळात या क्षेत्रात देशाचे पहिले स्थान असेल. सध्या सर्व नामांकित ब्रँड भारतात आहेत.
हे ही वाचा:
रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती ९० रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे २०२१ मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर तयार करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवावा, जास्तीत जास्त कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनं बनवावी, यासाठी केंद्र सरकार आणि अनेक राज्यं सरकारे प्रयत्न करत आहेत.