भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. एकूण दोन सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज पासून सुरू होत आहे. पंजाब येथील मोहाली क्रिकेट मैदानात हा सामना रंगणार आहे. ४ मार्च ते ८ मार्च या कालावधीत हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्यावर कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून धुरा सोपवल्या नंतर हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.
भारतीय संघासाठी हा सामना अधिक खास असणार आहे. त्याचे कारण म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील आघाडीच्या क्रिकेटपटू विराट कोहली याचा हा शंभरावा कसोटी सामना असणार आहे. २०११ मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून विराट कोहलीने अनेक नवनवे विक्रम पादाक्रांत केले आहे. त्यात आता या नव्या विक्रमाची भर पडणार आहे. त्यामुळे विराट कोहलीला हा सामना जिंकून भेट देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.
हे ही वाचा:
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी
श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या सामन्यात काही नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन ज्येष्ठ खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. सातत्याच्या अपयशामुळे त्या दोघांना बाहेर जावे लागले आहे. त्यामुळे या सामन्यात भविष्याच्या दृष्टीने त्या दोघांच्या जागी नम्मकी कोणाला संघात संधी मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तुलनेने कमजोर मानला जातो. पण तरीदेखील भारतीय संघ त्यांना हलक्यात घेऊ शकत नाही. त्यामुळे हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ जोमाने प्रयत्न करताना दिसेल.