चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’

चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’

दुसऱ्या दिवशीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. शुभमन गिल बाद झालेला असल्याने त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा रोहित शर्माची साथ द्यायला मैदानात उतरला होता. आजचा दिवस संपताना इंग्लंडने तीन बाद ५३ धावा केलेल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी अजून ४२९ धावांची आवश्यकता आहे.

दिवसाच्या सुरूवातीलाच चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे दोघेही अगदी थोड्याच काळाच्या अंतरात बाद झाले. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर कप्तान विराट कोहली मैदानात उतरला तर दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीला रिषभ पंत उतरला. मात्र रोहित शर्मा प्रमाणेच रिषभ पंतला देखील इंग्लीश यष्टीरक्षक बेन फोक्सने अफलातून यष्टिचित केले. अजिंक्य रहाणे १३ चेंडून १० धावांत तर अक्षर पटेल ७ धावांत बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विन कोहलीच्या साथीला उतरला. त्यादोघांनी इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरूवात केली. विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन दोघांनीही अर्धशतक पुर्ण केले. त्यानंतर कोहली बाद झाला, तरीही दुसऱ्या बाजूला अश्विन टिकून होता. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने दिमाखदार शतक देखील झळकावले. अश्विन १०६ धावांवर त्रिफळाचित झाल्यानंतर भारताचा डाव एकूण २८६ धावांवर आटपला. त्यामुळे भारताकडे ४८१ धावांची आघाडी होती.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला डॉम सिबली आणि रॉरी बर्न्स यांनी सुरूवात केली. डॉम सिबली ३ धावांवर बाद झाला. रविचंद्रन अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात २५ धावांवर असलेला बर्न्स फसला. त्यानंतर अगदी थोड्याच वेळाचा खेळ शिल्लक असल्याने नाईटवॉचमन म्हणून गोलंदाज लीचला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र तो पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने जो रूट खेळायला आला. त्यानंतर आजच्या दिवसाची समाप्ती होताना इंगलंडच्या खात्यात ५३ धावा जमा झाल्या.

Exit mobile version