भारताच्या शत्रू राष्ट्रांचे आता धाबे दणाणणार आहेत. कारण आता लवकरच त्यांच्यावर ‘प्रलय’ कोसळणार आहे. अस्सल भारतीय बनावटीच्या ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या (DRDO) मार्फत करण्यात आली आहे. ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी असून नव्या वर्षात हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल म्हणजेच बुधवार, २२ डिसेंबर रोजी ही चाचणी करण्यात आली. प्रलय हे सर्फेस टू सर्फेस अर्थात जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ओरिसाच्या किनाऱ्यावर असलेल्या डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. यावेळी ‘प्रलय’ क्षेपणास्त्राने आपले लक्ष अतिशय अचूक आणि भेदले.
हे ही वाचा:
माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी
उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
या नव्या क्षेपणास्त्राने इच्छित असे निम-बैलेस्टीक मार्गक्रमण पूर्ण करत, अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. क्षेपणास्त्राची नियंत्रण, मार्गदर्शन आणि मिशन अल्गॉरिदम प्रणाली यावेळी सुविहितपणे कार्यरत होती. त्याशिवाय, उपप्रणालीचे कामही समाधानकारक होते. पूर्व किनाऱ्यावर स्थापन केलेल्या सर्व सेन्सर्सनी या क्षेपणास्त्राचा माग घेत, प्रत्येक टप्प्यावरच्या घटनांची नोंद केली आहे.
या क्षेपणास्त्रात भक्कम असे प्रोपेलंट रॉकेट मोटरसह इतर अनेक आधुनिक तंत्रज्ञान आहे. या क्षेपणास्त्राची १५० ते ५०० किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून मोबाईल लॉंचरद्वारे ते सोडता येईल. क्षेपणास्त्राला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणालीत, अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली तसेच विमान तंत्रज्ञानही समाविष्ट आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ आणि त्यांच्याशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. अत्यंत जलदगतीने हे क्षेपणास्त्र विकसित करणे आणि या अत्याधुनिक जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कौतुकास्पद कामगिरी असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.