गुरुवार, २४ जून रोजी भारतातर्फे निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ओरिसाच्या किनारपट्टी भागातील चंदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज अर्थात आयटीआर येथून या क्षेपणास्त्राची चाचणी केली गेली. या क्षेपणास्त्राच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. सबसॉनिक क्रूज या प्रकारात मोडणारे हे क्षेपणास्त्र असून याची क्षमता एक हजार किलोमीटर इतकी आहे.
यूएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. निर्भय हे भारताचे एक महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जात असून यामुळे भारताची शस्त्रसज्जता आणखी बळकट होणार आहे. निर्भय क्षेपणास्त्र हे अमेरिकेच्या टाॅमहाॅक क्षेपणास्त्राच्या तोडीचे असल्याचे सांगितले जाते.
हे ही वाचा:
जमशेदजी टाटा ठरले जगातील दानशूर व्यक्ती
सर्जन नसतानाही त्याने केल्या १००० शस्त्रक्रिया! कशा?
ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला
बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, पण स्कायवॉक पूर्ण करा!
या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान अशाप्रकारचे आहे की शत्रूच्या रडारना हे क्षेपणास्त्र सापडणे कठीण आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता लक्षात घेता १००० किमी पर्यंतचे लक्ष्य ते अतिशय सहज भेदू शकते. हे एक ‘टू स्टेज’ प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. तर एकाचवेळी हे क्षेपणास्त्र जमीन, वायू आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणहून डागता येते.