दुबईत सध्या आशिया चषक २०२२ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये सुपर- ४ टप्प्यातला सामना पार पडला. काल झालेल्या चुरशीच्या लढतीत श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेने मात्र अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
श्रीलंकन गोलंदाज दिलशान मदुशंका, सी. करुणारत्ने, दसून शनाका यांनी केलेल्या टिचून गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने भारतीय संघाला फलंदाजी करण्यास भाग पाडलं. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. राहुल आणि विराट दोघंही स्वस्तात तंबूत परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. रोहितने ४१ चेंडूंत ७२ धावा करताना ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्यानंतर मात्र भारताचे फलंदाज काही अंतराने माघारी जात राहिले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या.
श्रीलंकेचे फलंदाज १७४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरले. पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी श्रीलंकेला भक्कम सुरुवात करून दिली. त्यांच्या अर्धशतकी खेळी श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल याने दोन फलंदाजांना तंबूत धाडून भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, अखेरच्या पाच षटकांत कर्णधार दसून शनाका आणि भानुका राजपक्षे यांनी ३४ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत: २० षटकांत ८ बाद १७३ (रोहित शर्मा ७२, सूर्यकुमार यादव ३४; दिलशान मदुशंका ३/२४) पराभूत वि. श्रीलंका: १९.५ षटकांत ४ बाद १७४ (पथुम शनाका ५२, कुशल मेंडिस ५७, दसुन शनाका नाबाद ३३, राजपक्षा नाबाद २५, युझवेंद्र चहल ३/३४)
भारताचं अंतिम फेरीत धडकण्याचं गणित
- भारताने सुपर- ४ फेरीतील दोन सामने गमावले आहेत. मात्र, भारताच्या अंतिम फेरीच्या आशा अजून पूर्णपणे संपुष्टात आलेल्या नाहीत.
- अफगाणिस्तानच्या संघाने बुधवारी होणाऱ्या लढतीत पाकिस्तानच्या संघावर मात करणे गरजेचे आहे. त्यानंतर भारताला गुरुवारी अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तर श्रीलंका संघाला पाकिस्तान संघाचा पराभव करावा लागेल.
- यानंतर श्रीलंका ६ गुणांचा टप्पा गाठेल. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडे प्रत्येकी २ गुण असतील. टायब्रेक ठरवण्यासाठी नेट रन रेट लागू होईल आणि सर्वोत्कृष्ट रेट असलेला संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. एकूणच अंतिम फेरीत पोहचण्यासाठी पाकिस्तानला एका विजयाची गरज आहे, तर भारताला अफगाणिस्तानला हरवून मग इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
- भारताने जर नेट रन रेट उत्तम ठेवून विजय मिळवला आणि पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला तर भारताला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे.