भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी- २० मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी- २० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. तर, विराट कोहलीही पुन्हा एकदा भारतीय संघातून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अखेरचे नोव्हेंबर २०२२ मध्ये टी- २० फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले असून आगामी टी- २० विश्वचषकाची ही तयारी आहे अशी शक्यता आहे. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. तर, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना देखील स्थान देण्यात आलेले नाही. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीत होणार आहे. दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये तर तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल. अफगाणिस्तानसोबतची ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत संघाला वर्ल्ड कपच्या तयारीची चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेनंतर २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात कोणत्या खेळाडूला स्थान मिळेल हे जवळपास निश्चित होणार आहे. टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा:
बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता
अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही
पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!
अफगाणिस्तानविरुद्च्या टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.