ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या आपल्या अखेरच्या लढतीआधीच स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित केला आहे. कारण दुसऱ्या गटातून पाकिस्तानचा प्रवेशही निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आता उपांत्य फेरीसाठी अन्य कोणताही संघ शर्यतीत नव्हता.
रविवारचा दिवस टी-२० वर्ल्डकपचे सगळे चित्र स्पष्ट करणारा होता. भारताने चार सामन्यातून ६ गुण मिळविले आहेत. त्यामुळे आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेशी झुंजणार असला तरी त्यांचा उपांत्य फेरीतील मार्ग मोकळा झाला आहे. भारताने पाकिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेशवर मात केली होती, पण दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्याच दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी हुकली.
पहिल्या गटात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला मात्र उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेला नाही. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सकडून हार सहन करावी लागली. जर तो सामना पावसामुळे वाया गेला असता तरी पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी होती कारण त्यांचा नेट रन रेट चांगला होता.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरेंनी केलेल्या बेईमानीचा बदला घेतला’
सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत
दाऊदसह पाच जणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केले आरोपपत्र
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. त्यांचे सलामीवीर मायबर्ग आणि मॅक्स ओ डोड यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा डाव मात्र १४५ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२७ धावा केल्या तर पाकिस्तानने ३ विकेट राखून ही धावसंख्या १९व्या षटकातच पूर्ण केली. नईमुल शांतो याने ५४ धावांची सर्वोच्च खेळी बांगलादेशतर्फे केली. त्याला उत्तर देताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (३२), बाबर आझम (२५), मोहम्मद हारिस (३१) यांनी योगदान दिले.
भारत आता रन रेटच्या तुलनेत मागे असल्यामुळे दुसऱ्या गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण झिम्बाब्वेला नमविल्यास ते पहिल्या क्रमांकावर पोहोचतील. त्यामुळे उपांत्य फेरीत त्यांची गाठ इंग्लंडशी पडू शकते. कारण पहिल्या गटात न्यूझीलंड आणि इंग्लंड हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.