रशियाच्या स्पुतनिक-५ च्या वापराला मान्यता
संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा कहर वाढत असताना, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या भारताने रशियाच्या आणखी एका लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारताच्या लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड, कोवॅक्सिन मागोमाग आता स्पुतनिक-५ ला सुद्धा डीजीसीआयने परवानगी दिली आहे.
रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) द्वारे सप्टेंबर २०२० मध्येच या लसीच्या चाचणीसाठी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबसोबत करार करण्यात आला होता. डॉ. रेड्डीज लॅबने गेल्या आठवड्यात भारत सरकारकडे ही लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. रशियाच्या या लसीची कार्यक्षमता अंतरिम चाचण्यांनुसार ९१.६ टक्के असल्याचा दावा केला जात आहे. ही आकडेवारी १९,८६६ लोकांवर केलेल्या चाचणीतून समोर आली आहे. सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी युएई, भारत, व्हेनेझुएला आणि बेलारूस या देशांत केली जात आहे, अशी माहिती स्पुतनिक-५ च्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!
लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा
शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी
दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
डॉ. रेड्डीज सोबत आरडीआयएफने भारतात दर वर्षी २ कोटी स्पुतनिक-५ लसींचे उत्पादन व्हावे यासाठी हैदराबादच्याच विर्चोव बायोटेक प्रा. लि. सोबत देखील करार केला आहे. स्पुतनिक-५ लस अतिशय वाजवी दरात उपलब्ध होणार असल्याचा दावा उत्पादकांकडून केला जात आहे. ही लस दोन अंश सेल्सियस ते आठ अंश सेल्सियस या तामानावर साठवली जाऊ शकते.
सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यात वाढत असलेल्या कोविड रूग्णांचा आलेख लक्षात घेऊन डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. भारताने आत्तापर्यंत सुमारे १ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. १४ एप्रिल पर्यंत भारत लसोत्सव साजरा करणार आहे. भारतात तिसऱ्या लसीची उपलब्धता झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवणे देखील शक्य होणार आहे.