बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशियाई वनडे क्रिकेट स्पर्धेचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे या सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या जगातील असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला.
श्रीलंकेतील पलेक्कल येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २६६ धावापर्यंत मजल मारली. पण पाकिस्तानचा डाव सुरू होण्यापूर्वी आलेल्या पावसामुळे अखेर हा सामनाच रद्द झाला.
भारताच्या इशान किशनने ८२ धावांची तर हार्दिक पंड्याने ८७ धावांची खेळी केल्यामुळे भारताला ४८.५ षटकांत २६६ धावांपर्यंत झेप घेता आली होती. त्याआधी, पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजीला हादरे दिले होते. आफ्रिदीने चार विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानतर्फे सर्वोत्तम कामगिरी केली तर रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी पण भारताचे पहिले चार फलंदाज ६६ धावांत परतले. कर्णधार रोहित शर्मा (११), विराट कोहली (४), श्रेयस अय्यर (१४), शुभमन गिल (१०) यांना अवघ्या ६६ धावा झालेल्या असताना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती पण इशान किशनने नंतर अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. हार्दिक पंड्या आणि त्याने पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर इशान किशन रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि आणखी ३५ धावांची भर घातल्यानंतर हार्दिक पंड्याही बाद झाला. जसप्रीत बुमराहने ३ चौकारांसह केलेल्या १६ धावांमुळे भारताने २६६ धावापर्यंत मजल मारली.
या सामन्याकडे सर्व क्रिकेटचाहत्यांच्या नजरा होत्या पण स्टेडियममध्ये उपस्थित राहिलेल्या २० हजार प्रेक्षकांच्या पदरी मात्र निराशा पडली. हा सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरला असून भारताला मात्र अद्याप नेपाळला पराभूत करायचे आहे. तसे झाल्यास ते सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. सोमवारी भारताची नेपाळशी गाठ पडणार आहे.