‘निज्जरच्या हत्येत सहभागाचे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या’!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाला ठणकावले

‘निज्जरच्या हत्येत सहभागाचे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या’!

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाली होती. या हत्येत भारतीय एजंट सहभागी असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाला ठणकावले आहे. ‘खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येशी संबंधित तपासाला भारताने कधीच नाही म्हटलेले नाही. मात्र निज्जरच्या हत्येत भारतीय एजंट सामील असल्याच्या दाव्याचे समर्थन करणारे पुरावे आधी द्या,’ असे जयशंकर यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. जयशंकर सध्या ब्रिटनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

खलिस्तानी दहशतवादी आणि टायगर फोर्सचा प्रमुख निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या कथित सहभागाबद्दल कॅनडाच्या ट्रूडो सरकारने कॅनडातून एका उच्च भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्याच्या सुमारे दोन महिन्यांनंतर जयशंकर यांचे हे विधान आले आहे. ‘तुमच्याकडे असे आरोप करण्याचे कारण असल्यास कृपया पुरावे द्या. आम्ही तपासाला नकार देत नाही,’ असे जयशंकर यांनी ब्रिटनमध्ये स्पष्ट केले.

कॅनडाने आपल्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी अद्याप कोणताही पुरावा भारताला दिलेला नाही, यावर जयशंकर यांनी जोर दिला. कॅनडातील खलिस्तानी समर्थक कारवायांच्या संदर्भातही जयशंकर यांनी ठाम भूमिका मांडली. ‘भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका विशिष्ट जबाबदारीसह येते आणि राजकीय हेतूंसाठी या स्वातंत्र्याचा गैरवापर सहन करणे अत्यंत चुकीचे असेल,’ असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू

शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग

जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज

पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी

परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावरील आणि वाणिज्य दूतावासावरील धुराच्या बॉम्ब हल्ल्यांची आठवण करून दिली. ‘भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना सार्वजनिकरीत्या घाबरवले गेले होते. कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

सप्टेंबरमध्ये कॅनडाने भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर, भारत सरकारनेही कॅनडाच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडातील राजनैतिक अधिकाऱ्यांचा भारताच्या अंतर्गत घडामोडीमध्ये वाढता हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवाया करत असल्याबाबत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती.कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांना तथ्यहीन संबोधत भारताने ते याआधीच फेटाळले आहेत.

Exit mobile version