नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

कवर्थ लुईसच्या नियमानुसार भारत-न्यूझिलंड सामना टाय

नशीब बलवत्तर… न्यूझीलंडचे ‘टाय टाय’ फीश

भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मॅक्लीन पार्क नेपियर येथे खेळला गेला. यजमान न्यूझिलंडच्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वरुणराजा अवतरला आणि हा सामना थांबवावा लागला. भारताच्या धावफलकावर ९ षटकात, ४ बाद ७५ धावा लागल्या होत्या. पण नशिब बलवत्तर होते. असे का म्हणतोय, तर या धावा डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना टाय करायला अगदी पुरेशा होत्या. भारत एका धावसंख्येने जरी मागे राहिला असता तर न्यूझीलंडने हा सामना खिशात टाकला असता. भारताने ही तीन सामन्यांची टी-२० मालिका १-० अशी जिंकली आहे

किवीने ठेवलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली. या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळताना दिसली. ऋषभ पंतने या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर ईशान किशन, श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. पंतच्या ११ धावा, ईशान किशन १० तर श्रेयस अय्यर शून्यावर तंबूत परतला. सूर्यकुमारलाही केवळ १३ धावा करता आल्या.

हे ही वाचा:

आफताब कोर्टात म्हणाला की, रागाच्या भरात मी केली श्रद्धाची हत्या

आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, गोळीबारात ६ जणांचा मृत्यू  

उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडायला सुरुवात

 

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने भारताच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ३६० फलंदाज सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्यांनी पॉवर प्लेमध्ये ५७ धावा कुटून काढल्या. पण षटकार खेचण्याच्या मोहात सूर्यकुमार झेल देऊन माघारी परतला. पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबविण्यात आला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला विजयासाठी नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना टीम इंडियाने ७५ धावा केल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना टाय झाला. याआधी झालेला दुसरा सामना भारताने जिंकला असल्याने ही मालिका १-० ने खिशात टाकली. याआधीचा दुसरा सामना भारताने ६५ धावांनी जिंकला होता आणि पहिला सामना पावसाने एक चेंडूही न टाकता वाहून गेला होता.

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे याने ४९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार आणि ५ चौकार लगावले. त्याला साथ देत ग्लेन फिलिप्सने ३३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीने ५४ धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही न्यूझिलंडच्या फलंदाजाला १५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाही. कॉनवे आणि फिलिप्स या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. त्यावेळेस न्यूझीलंड सहज १९० पर्यंत मजल मारू शकेल, असे वाटत होते. परंतु शेवटच्या चार षटकांत भारताने जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंडच्या ८ फलंदाजांना स्वस्तात माघारी परतवले. टीम इंडियाकडून गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. दोघांनी प्रत्येकी ४ जणांना तंबूचा रस्ता दाखवला.

Exit mobile version