न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

शेवटची एक विकेट मिळविण्यात भारताला आले अपयश

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळविण्याची भारताची संधी अवघ्या एका विकेटने हुकली. कानपूर येथे झालेल्या या कसोटीच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला २८० धावांची गरज होती तर भारताला पाहुण्यांच्या ९ विकेट्स घेणे अपेक्षित होते. पण भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या दिवशी ८ विकेट घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ ९ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र आणखी एक बळी मिळविण्यात भारताला अपयश आल्याने न्यूझीलंडला ही कसोटी अनिर्णीत राखण्यात यश आले. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत आता ०-० अशी बरोबरी आहे.

न्यूझीलंडने चौथ्या दिवशी विल यंग याला गमावले होते. तेव्हा न्यूझीलंडच्या खात्यात ४ धावा होत्या. त्यानंतर टॉम लॅथम (५२) आणि विल्यम समरविले (३६) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण नंतर मात्र न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होते गेले. त्यानंतर मात्र कोणत्याही जोडीला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही. तरीही केन विल्यमसन (११२ चेंडूंत अवघ्या २४ धावा), रचिन रवींद्रच्या ९१ चेंडूंतील १८ धावा तसेच अजाझ पटेलने २३ चेंडू टिच्चून खेळून काढत केलेल्या २ धावाही न्यूझीलंडच्या या चिवट झुंजीत महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे न्यूझीलंडला पराभव टाळता आला. भारताचे आर. अश्विन, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा यांनी प्रयत्नांची शर्थ केली पण न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. अखेर १२ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला आणि भारताच्या विजयाच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.

रवींद्र जाडेजाने ४० धावांत ४ तर अश्विनने ३५ धावांत ३ बळी घेतले. एक मात्र घडले ते म्हणजे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पराभूत झाला नाही. विजयी कर्णधार म्हणून असलेली अजिंक्य रहाणेची प्रतिमा टिकून राहिली.

स्कोअरबोर्ड :  भारत ३४५ आणि ७ बाद २३४ सामना अनिर्णीत वि. न्यूझीलंड २९६ आणि ९ बाद १६५.

Exit mobile version