वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी इतिहास लिहिला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सनी विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
टीम इंडियाने गेल्या १२ वर्षांत वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विजय मिळविला नव्हता. त्यामुळे ही लढत भारतासाठी खूप महत्त्वाची होती. पण हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विजय मिळविला. मागील वेळेस भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १० विकेट्सनी विजय मिळविला होता.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांपर्यंत मजल मारली. त्याला उत्तर देताना भारताने ५ विकेट्स गमावून हे लक्ष्य पार केले.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत कांगारुंना ३५.४ षटकांत १८८ धावांवर रोखले. त्यात मिचेल मार्शने केलेली ८१ धावांची खेळी ही सर्वोत्तम होती. भारताच्या वतीने मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले तर रवींद्र जाडेजाने २ तर हार्दिक पंड्या व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. शार्दुल ठाकूर वगळता इतर सगळ्या गोलंदाजांनी विकेट्स मिळविल्या.
हे ही वाचा:
भाजप नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून
विदर्भात येणार पांढरी समृद्धी , इतक्या लाख लोकांना मिळणार रोजगार
काँग्रेस आजचा नवा मुघल, मुघलांनी देश कमकुवत केला
त्यानंतर फलंदाजीत के.एल. राहुलने ७५ धावांची नाबाद खेळी करत या विजयात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भारताची सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर इशान किशन ३ धावांवर बाद झाला तर विराट कोहलीला ४ धावाच करता आल्या. भरवशाचा फलंदाज सूर्यकुमारला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे मोठे आव्हान होते पण राहुल आणि रवींद्र जाडेजाने (४५) १०८ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जाडेजाने २ विकेट्सही घेतल्या त्यामुळे त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
स्कोअरबोर्ड
ऑस्ट्रेलिया सर्वबाद १८८ (३५.४ षटके) मिचेल मार्श ८१, स्टीव्ह स्मिथ २२, जोश इंग्लिस २६, शमी १७-३, सिराज २९-३, जाडेजा ४६-२) पराभूत वि. भारत ३९.५ षटकांत ५ बाद १९१ (शुभमन गिल २०, के.एल. राहुल ७५, हार्दिक पंड्या २५, मिचेल स्टार्क ४९-३, मार्कस स्टॉइनिस २७-२), सामनावीर : रवींद्र जाडेजा