टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय आणि नंतर नेदरलँड्सला दिलेला पराभवाचा धक्का यानंतर भारताला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात. भारतावर दक्षिण आफ्रिकेने ५ विकेट्सनी मात केली. पण या पराभवामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न मात्र भंगणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तानला या स्पर्धेत आतापर्यंत दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल का याविषयी शंका घेतली जात आहे. त्यातच भारताच्या पराभवामुळे समीकरणे बदलली आहेत.
पाकिस्तानने आपले खाते रविवारी अखेर उघडले. त्यांनी नेदरलँड्सवर मोठ्या फरकाने मात केली. तरीही त्यांचे लक्ष भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याकडे होते. त्यात भारत पराभूत झाला असता तर पाकिस्तानला उपांत्य फेरीचे स्वप्न पाहता आले असते. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ गुणांसह आघाडीवर आहे तर भारत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश (४), झिम्बाब्वे (३), पाकिस्तान (२) आणि नेदरलँड्स (०) या क्रमाने गुणतक्त्यात आहेत.
दक्षिण आफ्रिकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला असला तरी आता उर्वरित सामन्यात भारताने विजय मिळविणे पाकिस्तानसाठी अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप कुणाकडूनही पराभूत झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेचे या गटात सर्वाधि ५ गुण आहेत. भारताने जर आपल्या उर्वरित लढती जिंकल्या तर त्यांचे ८ गुण होतील. जरी पाकिस्तानने पुढील लढतीत दक्षिण आफ्रिकेला नमविले तरी त्यांचा पुढील मार्ग खडतरच आहे. कारण केवळ पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला नमविले पाहिजे असे नव्हे तर भारतीय संघ बांगलादेशकडून पराभूत व्हायला हवा आणि नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवायला हवा. तरच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहू शकेल.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री आणि घटनात्मक व्यक्तिविरोधात ट्विट करणाऱ्या एकाला अटक
मोरबीचा झुलता पूल कोसळला, ५०० हून अधिक लोक बुडाले
भारत वाहतूक विमानांचाही मोठा उत्पादक बनेल
दरम्यान, भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ बाद १३३ धावा केल्या. त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने ५ बाद १३७ धावा करत २ चेंडू आणि पाच विकेट्स ठेवत विजय मिळविला.
भारतातर्फे सूर्यकुमार यादवचा फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला. त्याने ६८ धावांची सर्वोच्च खेळी केली तर दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने ४ बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेतर्फे ऐडन मार्करामने ५२ तर डेव्हिड मिलरने ५९ धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले.