टी-२० वर्ल्डकपमधील सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला भारतीय संघाला रविवारी सामोरे जावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११० धावा केल्या. त्याला न्यूझीलंडने २ फलंदाज गमावून यशस्वी उत्तर दिले. या पराभवामुळे भारताच्या स्पर्धेतील आव्हानाला मोठा धक्का बसला आहे. आता अफगाणिस्तानविरुद्धची पुढील लढत भारताला जिंकावी लागेल, अन्यथा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे आव्हान स्पर्धेतून अकाली संपुष्टात येईल.
पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने १० विकेट्सनी पराभूत केले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. पण भारताने नाणेफेक गमावली आणि तिथून भारताच्या पराभवाचा पाया रचला गेला. याच खेळपट्टीवर इंग्लंडने शनिवारी ऑस्ट्रेलियाला तडाखा दिला होता.
भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११० धावा केल्या. त्यात रवींद्र जाडेजाच्या २६ धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्याखालोखाल हार्दिक पंड्याने २३ धावा केल्या. भारताच्या या धावसंख्येला न्यूझीलंडने ८ विकेट्स राखून अगदी सहजसोपे प्रत्युत्तर दिले. डॅरिल मिचेलने ३५ चेंडूंत ४९ धावा करत न्यूझीलंड संघाला एक मोठा विजय मिळवून दिला. १४.३ षटकांतच न्यूझीलंडने हा सामना जिंकला. भारताला आपल्या डावात अवघे १० चौकार लगावता आले. फिरकीचा सामना करण्यात वाकबगार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला इश सोधी आणि सॅन्टनर या फिरकी गोलंदाजांना एकही चौकार लगावता आला नाही.
हे ही वाचा:
…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव
१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष वानखेडे कुटुंबियांच्या भेटीला
आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप
आता बुधवारी भारताची गाठ मोहम्मद नबीच्या अफगाणी संघाशी आहे. अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना होतो आहे.
आता भारताला उरलेल्या तीनही लढती जिंकाव्या लागतील. त्यात स्कॉटलंड आणि नामिबिया हे पात्रता फेरीतून आलेले संघही आहेत. नामिबियाने एक सामना जिंकत भारतापेक्षा वरचे स्थान मिळविले आहे. दुसऱ्या गटात भारत पाचव्या क्रमांकावर तर नामिबिया चौथ्या क्रमांकावर आहे.
स्कोअरबोर्ड
भारत ७ बाद ११० (राहुल १८, रोहित शर्मा १४, ऋषभ पंत १२, हार्दिक पंड्या २३, रवींद्र जाडेजा २६, बोल्ट २०-३, सोधी १७-२) पराभूत वि. न्यूझीलंड २ बाद १११ (मार्टिन गप्टिल २०, मिचेल ४९).