महेश विचारे
भारतीय संघाला विश्वविजेतेपदापासून वंचित राहावे लागले. सलग १० सामने जिंकल्यानंतर वर्ल्डकप आपलाच अशी पक्की खात्री झालेली असताना भारताचा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने सारे चित्रच पालटून टाकले. भारताला एक मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी आपण वर्ल्डकप जिंकणार अशी जणू काळ्या दगडावरची रेघच होती. पण खेळात काहीही होऊ शकते. होत्याचे नव्हते होते. सलग १० सामने जिंकणारा भारतीय संघ ११व्या सामन्यात पराभूत झाला पण तोच सामना नेमका अंतिम सामना होता. या सामन्याचे तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करणे शक्य आहे. पण त्यात न पडता भारतीय संघ पराभूत झालेला असताना ऑस्ट्रेलियन संघ मात्र सहा वर्ल्डकप का जिंकू शकला याचे विवेचन होणेही आवश्यक आहे. तर आपल्याला भारतीय संघ यावेळी का जिंकू शकला नाही यामागील कारणमीमांसा लक्षात येईल.
आधीच्या सर्व सामन्यात भारताने एकापाठोपाठ एक विजय मिळविला तेव्हा भारताच्या सांघिक कामगिरीची चर्चा झाली. फलंदाज, गोलंदाज यांच्यातील योग्य समन्वयामुळे भारतीय संघ विजयी ठरल्याचे बोलले जात होते. पण याचाच नेमका अभाव अंतिम सामन्यात दिसून आला. भारताला या सामन्यात सांघिक कामगिरीच करता आली नाही. एक विस्कळीतपणा संघाच्या एकूण खेळात दिसत होता. एकापेक्षा एक सरस फलंदाज असताना भारतीय फलंदाजांपैकी एकालाही शतकी खेळी साकारता आली नाही, हे विशेष. त्याचा फटका भारताला बसला. के.एल. राहुल, विराट कोहली यांनी अर्धशतके ठोकली पण ती प्रभावी ठरली नाहीत. निदान ३००-३५० धावा भारताकडून अपेक्षित असताना फक्त २४० धावसंख्येपर्यंत भारताने मजल मारली. त्यामागील कारण ऑस्ट्रेलियाची रणनीती आहे.
खरे तर संघ विजेता ठरला की लगेच त्यांच्या रणनीतीबद्दल बोलले जाते, त्या रणनीतीचे कौतुक केले जाते. पण ऑस्ट्रेलियाच्या रणनीतीबरोबरच भारताच्या विस्कळीत रणनीतीचीही चर्चा व्हायला हवी. भारतीय संघाने आधीच्या सर्व सामन्यात विजय मिळविला त्यावेळी केलेल्या शतकी खेळी, गोलंदाजांची कमाल हे सगळे अंतिम सामन्यात मात्र दिसले नाही. कारण त्यात तो समन्वयच नव्हता. प्रत्येक सामन्यासाठी जे एक नियोजन आवश्यक असते, त्याचाच अभाव आहे की काय, अशी स्थिती होती.
हे ही वाचा:
द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अनोखा प्रवास; युवा विश्वचषक ते एकदिवसीय विश्वचषक फायनल
स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय पुढच्या पिढीसाठी उपयुक्त
‘डीपफेक व्हिडीओ’बाबत मोदी सरकार कठोर
शुभमन गिल खेळतोय, भारतीय संघ करणार फलंदाजी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
शुभमन गिल, श्रेयस अय्यर झटपट माघारी परतले आणि अर्धशतकापूर्वीच भारताने तीन फलंदाज गमावले होते. त्यातून भारतीय संघ सावरूच शकला नाही. एखाद्या फलंदाजाने तरी एक बाजू लावून धरली असती तरी भारतीय संघ तीनशे धावांच्या आसपास पोहोचू शकला असता पण नेमके तेच झाले नाही. अगदी हीच बाब ऑस्ट्रेलियाने मात्र केली. अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती सर्वांनी पाहिली होती पण त्यातून ग्लेन मॅक्सवेलने संघाला बाहेर काढले आणि सामना जिंकून दिला. अंतिम सामन्यात तीच जबाबदारी ट्राविस हेडने पार पाडली. स्टिव्ह स्मिथ, वॉर्नर, मिचेल मार्श बाद झाल्यानंतर संकटात सापडलेल्या संघाला हेडने सुखरूप बाहेर काढले. संघातील एकाने तरी चिवट खेळ करून संघाला संकटमुक्त करण्याचे धोरण ऑस्ट्रेलियाने पूर्णत्वास नेले.
धावाच झालेल्या नसल्यामुळे अर्थात त्यांचा बचाव करण्याची जबाबदारी गोलंदाजांवर टाकणे योग्य नाही. २४० या धावसंख्येचा अशा दबावाच्या क्षणी बचाव करणे हे सोपे नसते. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला कांगारुंना धक्के दिले पण हेड आणि लाबुशेन यांनी अधिक यश मिळू दिले नाही. हेडने १३७ धावांची केलेली नाबाद खेळी वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवी. अत्यंत चिवट खेळ करत त्याने अलगद ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. ती जबाबदारी भारतीय फलंदाजांपैकी कुणी उचलली नाही.
कदाचित वैयक्तिक विक्रम, वैयक्तिक कामगिरी यात आपण जरा जास्तच अडकून पडतो की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. कुणी षटकारांचा विक्रम केला, कुणी शतकांचा विक्रम केला, कुणी गोलंदाजीत सर्वाधिक बळी मिळविले हीच आपल्यादृष्टीने मोठी गोष्ट ठरते आणि त्यातच आपण गुंतून पडतो. परिणामी, सांघिक कामगिरी दुय्यम ठरते. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांच्या कामगिरीची खूप चर्चा गेल्या काही दिवसांत झाली. मात्र अंतिम सामन्यात नेमकी तीच कामगिरी दिसली नाही. आता कदाचित संघनिवडीची, संघाच्या कामगिरीची पुढील काही दिवस चर्चा होईल. मात्र आपल्या प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे. आपण विजेतेपदाच्या या महासंग्रामात आपली कामगिरी उंचावलीच नाही. आधीच्या सामन्यात आपण जे करून दाखविले त्यापेक्षा काकणभर सरस आपल्याला ठरणे आवश्यक होते. मात्र त्यापेक्षाही आपली कामगिरी घसरली आणि ती पराभवास कारणीभूत ठरली.
ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वचषक जिंकतो ही साधीसोपी गोष्ट नाही. हे नशिबाची साथ आहे म्हणून घडत नाही तर त्यामागे निश्चित नियोजन, संघ जिंकावा यासाठी असलेली भूक, पूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन, खेळाडूंमध्ये असलेली शिस्त आणि मुख्य म्हणजे आपण खेळाडू म्हणून मोठे असलो तरी सामन्यात संघापेक्षा आपण मोठे नाही ही भावना कुणालाही विजयाच्या समीप घेऊन जाते. ऑस्ट्रेलियाकडे हा दृष्टिकोन आहे. त्यामुळेच आठवेळा ते अंतिम फेरीपर्यंत धडक मारतात आणि सहावेळा विश्वविजेतेपद पटकावितात. भारतीय संघ प्रसिद्धीच्या झोतात असतो, खेळाडू चर्चेत असतात पण प्रत्यक्ष महत्त्वाच्या सामन्यात मात्र त्याचे प्रतिबिंब अनेकवेळा पडतच नाही आणि आपला तो डोलारा केव्हा कोसळतो हे कळत नाही. ही मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रबळ होऊ.