नांद्रे बर्गरने घेतलेल्या चार बळींमुळे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. एक डाव आणि ३२ धावांनी यजमान दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. भारताची सुमार फलंदाजी हे पराभवाचे कारण ठरले.
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा गोलंदाज नांद्रे बर्गर भारतीय संघासाठी मारक ठरला. त्याने ३३ धावांत भारताचे चार मोहरे टिपले आणि भारताचा पराभव निश्चित केला. त्याला कॅगिसो रबाडा (२-३२) आणि मार्को जॅनसन (३-३६) यांची साथ लाभली. भारताचा दुसरा डाव १३१ धावांतच आटोपला.
भारतीय फलंदाजीत एकमेव फलंदाज तग धरू शकला तो म्हणजे विराट कोहली. त्याने ८२ चेंडूंत ७६ धावा केल्या. रबाडाने धावत जाऊन त्याला उत्कृष्ठ झेल टिपला. विराट बाद झाल्यानंतर भारताचा डाव आटोपला आणि दक्षिण आफ्रिकेने एका डावाने पहिली कसोटी जिंकली. ही दोन कसोटी साामन्यांची मालिका आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसची थीम ‘है तय्यार हम’ असली तरी लोक मात्र तयार नाहीत!
करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!
दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!
अयोध्या; चौरासी (८४) कोसी परिक्रमा परिसरात ‘दारू बंदी’!
दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात ४०८ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यात एल्गरच्या १८५ धावांच्या खेळीचा समावेश होता. मार्को जॅक्सनने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी ८४ धावांची खेळीही करून दाखविली. तर भारताने आपल्या पहिल्या डावात के.एल. राहुलच्या शतकामुळे २४५ धावा केल्या होत्या.
एल्गरने याआधी १९९ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केलेली होती. पण द्विशतकी खेळी काही त्याला साकारता आलेली नव्हती. यावेळी ती संधी असतानाच शार्दूल ठाकूरच्या उसळत्या चेंडूने त्याचा घात केला. मात्र त्यानंतर जॅनसनने चिवट फलंदाजी केली. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. ही भागीदारी भारतासाठी महागडी ठरली.
भारताच्या आज झालेल्या डावात चहापानाला ३ बाद ६३ अशी अवस्था होती. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर होते. अय्यर ६ धावा करून परतला तर राहुलने ४ धावा केल्या. अश्विनला भोपळाही फोडता आला नाही तर शार्दूल २ धावा करू शकला. भारताची पुढील लढत केप टाउनला होणार आहे. ३ जानेवारीपासून ही लढत खेळवली जाणार असून ही या मालिकेतील दुसरी आणि शेवटची लढत असेल. त्यात भारत बरोबरी करू शकणार का याचे उत्तर मिळेल.