बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात पाच कसोटींची मालिका सुरु आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरोधात विजय मिळवत आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी मोठा विजय मिळवला. या स्पर्धेचा पहिला सामना भारताने जिंकला होता तर, दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. तिसरा सामना बरोबरीने सुटला होता. त्यामुळे या चौथ्या सामन्यात दोन्ही संघांना आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताच्या आघाडीच्या फलंदाजीच्या सुमार कामगिरीचा जबरदस्त फटका संघाला बसला आणि हा सामना गमवावा लागला.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. घेतलेला निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून ४७४ धावांचा डोंगर उभा केला. सलामीला आलेल्या सॅम कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी अनुक्रमे ६० आणि ५७ धावांची खेळी केली. पुढे मार्नस लाबुशेन याने ७२ धावा जोडल्या तर स्टीव्हन स्मिथ याने १४० धावांची खेळी केली. भारतासाठी आव्हान ठरणाऱ्या ट्रेव्हिस हेडला मात्र भोपळाही फोडता आला नाही. यानंतर एलेक्स कॅरे याने ३१ धावांची खेळी केली तर कर्णधार पॅट कमिन्स याने महत्त्वाचे ४९ धावा फलकावर जोडल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सांघिक खेळामुळे ४७४ धावा जोडल्या गेल्या.
भारतीय गोलंदाजांकडून जसप्रीत बुमरा याने उत्तम प्रदर्शन दाखवत चार फलंदाजांना माघारी धाडले तर फिरकीपटू जडेजा याने तीन फलंदाज बाद केले. अक्ष दीप याने दोन तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतला. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. दिग्गज खेळाडूंना आणि विशेषतः आघाडीच्या फलंदाजांना आपली चमक या सामन्यात दाखवता आली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला आले. रोहित शर्मा या सामन्यातही अगदी स्वस्तात माघारी परतला. केवळ तीन धावा रोहित शर्माला करता आल्या. दुसरीकडे यशस्वी जयस्वाल याने ८२ धावांची खेळी करत आपली चमक दाखवली. मात्र, विराट कोहली आणि त्याच्यात झालेल्या धाव घेण्याच्या गोंधळामुळे यशस्वी याने आपली विकेट गमावली. पहिल्या डावात के एल राहुल याने २४ धावा केल्या तर विराट कोहली याने ३६ धावा केल्या. रिषभ पंत आणि जडेजा यांनी अनुक्रमे २८ आणि १७ धावा केल्या. त्यांना फराशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनी भारताचा डाव सावरत आशा पल्लवित ठेवल्या. नितीश याने ११४ धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा जोडल्या. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. भारताने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतले.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने २३४ धावा करत भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन याने सर्वाधिक ७० धावा केल्या. तर, पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी ४१ धावा केल्या. या डावात भारताकडून जसप्रीत बुमरा याने पाच विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज याने तीन विकेट्स घेतल्या. तर, रवींद्र जडेजा यानेही एक विकेट घेतली.
हेही वाचा..
दक्षिण कोरियाचे विमान कोसळण्याआधी काय घडले ?
पायांना स्पर्श केला तर काम करणार नाही; खासदाराच्या कार्यालयात अनोखा फलक
इस्रोचे स्पाडेक्स मिशन आजपासून
‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजींच्या मृत्यूचे कारण हत्या की आत्महत्या?
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने एकाकी भारतीय संघाचा डाव धरून ठेवला होता. आघाडीचे सर्वच दिग्गज खेळाडू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यशस्वी याने ८४ धावा केल्या. रिषभ पंत याने ३० धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाकी एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही आणि भारतीय संघ १५५ धावा करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर नाथन लायन याने दोन खेळाडूंना माघारी धाडले, तर ट्रेव्हिस हेड आणि मार्क यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील विजयासह या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता पुढचा आणि अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर सिडनी कसोटी भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावी लागेल अशी आकडेवारी आहे.