ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काही अज्ञात बदमाशांनी त्यांच्या दिल्लीतील घराची नासधूस केल्याचा आरोप केला आहे. ओवेसी यांनी ‘एक्स’वर त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरील चित्रण शेअर केले आहे, ज्यात ३४ अशोका रोड येथे असलेल्या त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या नेम प्लेटवर काळी शाई फेकल्याचे दिसून येत आहे.
‘काही अज्ञात बदमाशांनी आज माझ्या घरावर काळी शाई फेकली. माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर आता कितीवेळा हल्ले झाले आहेत, हे मोजणेच मी सोडून दिले आहे, असेही ओवेसी यांनी पोस्ट केले. किमान पाच जणांचा एक गट ओवेसी यांच्या घराबाहेर इस्रायल समर्थक पोस्टर चिकटवताना दिसला. त्यांच्या घराची नासधूस केल्यानंतर जमावाने ओवैसी यांच्या घराबाहेर ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एकाने इस्रायल समर्थक पोस्टर चिकटवल्यानंतर, “भारत माता की जय” म्हणण्यापासून परावृत्त करणाऱ्या खासदार आणि आमदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. “आम्ही हे केले आहे आणि देशातील १४० कोटी लोकांनी तेच केले पाहिजे. ओवेसींसह ‘भारत माता की जय’ म्हणण्याचे टाळणाऱ्या खासदार आणि आमदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे एक व्यक्ती या व्हिडीओत म्हणताना ऐकू येत आहे. अशा घटना रोखण्यात दिल्ली पोलिस असमर्थ ठरत असल्याबाबत ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही त्यांच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये टॅग केले आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच या घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला.
‘जेव्हा मी दिल्ली पोलिसांना विचारले की, त्यांच्या नाकाखाली हे कसे काय घडू शकते. तेव्हा त्यांनी असहायता व्यक्त केली. अमित शहा, तुमच्या दुर्लक्षामुळेच हे घडते आहे. ओम बिर्ला, कृपया आम्हाला सांगा की खासदारांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल की नाही,’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. ओवेसी यांनी या समाजकंटकांच्या कृतीचा निषेध केला, त्यांना भ्याड म्हटले आणि अशा डावपेचांचा अवलंब करण्याऐवजी त्यांना थेट सामोरे जाण्याचे आव्हान दिले.
हे ही वाचा:
तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला भारत
पुण्याहून बसचा पाठलाग करून दादरमध्ये लूट करणाऱ्या कोयता गॅंगचे सदस्य पकडले
टीएमसी खासदारांना राज्यसभा अध्यक्षांनी फटकारले
‘माझ्या घराला लक्ष्य करणाऱ्या दोन गुडांना: यामुळे मी घाबरणार नाही. हे सावरकर प्रकारचे भ्याड वर्तन थांबवा आणि पुरुषासारखे मला तोंड द्या. थोडी शाई फेकून किंवा काही दगड मारून पळून जाऊ नका,’ असे त्यांनी यात लिहिले आहे.
ओवेसी यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला. या शपथविधीरम्यान त्यांनी त्यांनी संघर्षग्रस्त देशाचा उल्लेख केला. त्यामुळे येथे काहीकाळ गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांनी ही टिप्पणी काढून टाकण्याचे आदेश दिले.
ओवेसी यांनी मात्र सभागृहातून बाहेर आल्यानंतर आपल्या घोषणांचे समर्थन केले आणि त्यांनी जे काही बोलले त्यात काहीही चुकीचे नसल्याचे पत्रकारांना सांगितले. नंतर, ओवेसी यांच्या विरोधात कलम १०२ (४) अंतर्गत परदेशी राष्ट्राशी निष्ठा दर्शविल्याबद्दल दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या. पाचव्यांदा लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतलेल्या ओवेसी यांनी ते भारताच्या उपेक्षितांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडत राहतील, असे ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये नमूद केले.