भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एक्सरे पोलॅरिमीटर सॅटेलाइट’चे (एक्स्पोसॅट) यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणातून भविष्यवेधी अवकाश तंत्रज्ञानाची चाचणी करणाऱ्या इतर दहा प्रयोगांनाही अपेक्षित कक्षेत सोडण्यात आले. पीएचएलव्हीने आपल्या ६०व्या प्रयाणात हे सॅटेलाइट ६५० किमीच्या कक्षेत ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले आहे. ‘२०२४ची अतिशय उत्तम सुरुवात केल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन. अवकाश संशोधन क्षेत्रासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे भारताची या क्षेत्रातील कामगिरी अधिक उंचावेल. यासाठी इस्रोतील आपले शास्त्रज्ञांचे आणि भारताला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी झटणाऱ्या सर्व अवकाश संशोधनातील बांधवांना शुभेच्छा’ अशा शब्दांत मोदी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनीही ही आपल्या सर्वांना नववर्षाची भेट असल्याचे नमूद केले आहे.
श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी ५८) साह्याने एक्स्पोसॅटच्या इतर दहा प्रयोगांनी यशस्वी उड्डाण केले. उड्डाणापासून २२ मिनिटांनी जमिनीपासून ६५० किमीच्या कक्षेत ‘एक्स्पोसॅट’ या मुख्य उपग्रहाला यशस्वीरीत्या प्रस्थापित केल्यानंतर प्रक्षेपणाचा पहिला टप्पा पार पडला.
हे ही वाचा:
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!
बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
बेंगळुरू येथील रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रे (पोलिक्स) आणि यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरने तयार केलेल्या एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंप (एक्सपेक्ट) या दोन वैज्ञानिक उपकरणांचा समावेश आहे. उच्च वस्तूमान आणि घनता असलेली कृष्णविवरे (ब्लॅकहोल), न्यूट्रॉन तारे, पल्सार, दीर्घिकांची (गॅलेक्सी) केंद्रे यांच्याकडून उत्सर्जित झालेल्या ध्रुवीभूत एक्सरेच्या नोंदी घेण्याचे काम ‘एक्स्पोसॅट’ पुढील पाच वर्षे करणार आहे. एक्पोसॅट हे जगातील अवघे दुसरे एक्स-रे पोलॅरिमेट्री मिशन आहे. याआधी नासाने इमेजिंग एक्सरे पोलॅरिमेट्री एक्स्पोरल (आयएक्सपीई) मिशन सन २०२१मध्ये प्रक्षेपित केले होते.