विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे. या संघाला अंतिम सामन्यात रोखणे कठीण आहे,’ अशी कबुली त्याने दिली आहे.
भारताच्या क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडवर मात करून सलग दहाव्या विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला पत्रकारांनी भारताच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला. ‘भारतासाठी पुढील सामना कसा असेल? भारताचा संध जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे आणि आता ते त्यांचा सर्वोत्तम खेळ दाखवत आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी कठीण असेल. या संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे ते खेळत आहेत, ते अतिशय विलक्षण आहे,’ असे कौतुक केन याने केले.
‘त्यांनी प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घेतला. उपांत्य फेरीत येण्यासाठी त्यांनी विजयाची एकही संधी गमावली नाही. ते ज्या प्रकारे खेळले, त्याला तोड नाही. ते ज्या प्रकारे खेळत आहेत, हे पाहून ते आणखी आत्मविश्वासाने पुढच्या सामन्यात उतरतील,’ असा विश्वास विल्यमसन याने व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘न्यूझीलंडवरील हल्ल्यानंतर मोहम्मद शमीला अटक करू नका’
पाकिस्तानच्या वाईट कामगिरीनंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार
गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू
शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग
उपांत्य फेरीतील या विजयानंतर भारताचा संघ चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यत पोहोचला आहे. भारताने याआधी सन १९८३ आणि २०११मध्ये विश्वचषक उंचावला आहे. तर, सन २००३मध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आज, गुरुवारी पाचवेळा जगज्जेते ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यांच्यातील विजेत्या संघाशी भारताची अंतिम सामन्यात लढत होईल.