रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

रोहित शर्मा आणि कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालची ८० धावांची भागिदारी

रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालने ८० धावांची भागिदारी करून सामन्यावर चांगली पकड मिळवून दिली. त्यामुळे सध्या भारत हा वेस्ट इंडिजच्या केवळ ७० धावांनी पिछाडीवर आहे. अश्विनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला नामोहरम केल्यामुळे त्यांचा संघ पहिल्या डावात केवळ १५० धावांतच आटोपला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पावसामुळे खेळ पाच मिनिटे उशिराने सुरू झाला. मात्र त्याचा भारतीय सलामीवीरांच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वालनेही स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ घेतला. १६व्या चेंडूला तडकावत त्याने खाते उघडले आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने सहा चौकार लगावत नाबाद ४० धावा केल्या.

बुधवारी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि तेगनारायण चंदरपॉल यांनी जोरदार सुरुवात करून दिली आणि ३१ धावा केल्या. मात्र ही भागिदारी अल्पजीवी ठरली. रवीचंद्रन अश्विनने दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले आणि भारताची पकड मजबूत होण्यास सुरुवात झाली.

भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिजच्या संघाची डाळ शिजली नाही. रेमन रीफर आणि जर्मैन ब्लॅकवूड त्यांचा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आणि जेवणाच्या वेळेपूर्वीच त्यांना माघारी परतावे लागले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने सूत्रे आपल्या हातात घेतली. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच लगेचच जाडेजाने जोशुआ डिसिल्वाला बाद केले. त्यानंतर जेसन होल्डरने पदार्पण करणाऱ्या एलिक एथानेझ याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागिदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजला किमान १००चा पल्ला गाठता आला. मात्र एथॅनेझ ४७ धावांवर असताना त्याला अश्विनने बाद केले. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. नंतरही वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळत गेला आणि त्यांना अवघ्या ६४.३ षटकांत १५० धावांवरच मजल गाठता आली.

हे ही वाचा:

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

जम्मू- काश्मिरात पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

४५ वर्षांनंतर यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली

उपनिषदांमध्येही नमूद आहे हवामान विभागाचे रहस्य

अश्विनचे ७०० बळी

अश्विनने ६० धावा घेऊन पाच विकेट घेतल्या. त्याने कसोटी सामन्यांत पाच विकेट घेण्याची कामगिरी ३३वेळा केली आहे. तर, वेस्ट इंडिजविरोधात त्याने अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. ७०० हून अधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे (९५६) आणि हरभजन सिंग( ७११) यांनी ही कामगिरी केली आहे.

Exit mobile version