भारतीय संघाने इतिहास रचत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात असतानाच ही आनंदाची बातमी मिळाली आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करत त्यांचं स्वप्नं धुळीस मिळवलं आहे. त्याचा थेट फायदा भारताला होऊन अंतिम फेरीचं तिकीट मिळालं आहे.
भारतीय संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय आवश्यक होता. परंतु ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात सावध पवित्रा घेत ही कसोटी अनिर्णयीत राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यांच्या या खेळीने भारताच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या. परंतु न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवून भारताला अंतिम फेरीचे दार उघडून दिले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत आता ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. ऑस्ट्रेलिया संघ याआधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला हा सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर उभारला. उस्मान ख्वाजाने दमदार शतक झळकावत १८० धावा केल्या. त्याला ग्रीनने चांगली साथ देत ११४ चोपून काढल्या. अश्विनने सहा विकेट्स घेतल्या. भारताने प्रत्युत्तरात तोडीस तोड उत्तर देत ५७१ धावा काढल्या. विराट कोहलीने बऱ्याच वर्षानंतर शतक झळकावत १८६ धावा केल्या. भारताला ९१ धावांची आघाडी मिळाली. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सावध पवित्रा घेत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १७५ धावा केल्या. शेवटी सामना अनिर्णीत राहिला.
हेही वाचा :
सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!
ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून
नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर
लंडनच्या ओव्हल मैदानावर अंतिम फेरीचा सामना ७ ते ११ जून दरम्यान खेळवला जाईल. १२ जून रोजी या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता.
न्यूझीलंडने श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव केला
इंदूर कसोटीत भारताच्या पराभवामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण मनोरंजक बनले. टीम इंडियाला अंतिम फेरीसाठी काही काळ वाट पाहावी लागली. इंदूर कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे स्थान निश्चित झाले, पण भारताचे गणित श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी सामन्यावर येऊन थांबले. श्रीलंका सध्या न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे, त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिका २-० ने जिंकणे आवश्यक होते, जे होऊ शकले नाही.
क्राइस्टचर्च येथे झालेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेने ३५५ धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिले दोन दिवस गाजवले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७३ धावा केल्या. डिरेल मिशेलने दमदार शतक ठोकले. पण प्रत्युत्तरात श्रीलंकेने दुसऱ्या डावात पलटवार करत ३०२ धावा केल्या. त्यात अँजेलो मॅथ्यूजच्या धडाकेबाज शतकाचा समावेश होता. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य दिले. शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठणे शक्य होते पण ते अवघड होते. क्रिकेटमध्ये काहीही चमत्कार होऊ शकतो असे म्हणतात. न्यूझीलंडने शेवटच्या षटकापर्यंत सामना बरोबरीत ठेवला आणि शेवटी विजय मिळवला.