भारताच्या पुरुष हॉकी संघाने ब्राँझपदकाच्या झुंजीत जर्मनीला ५-४ असे नमवून ४१ वर्षांनी पदक जिंकल्यानंतर देशभरात उत्साह संचारला आहे. या सगळ्या घडामोडींचा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेतला आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या कामगिरीची तुलना करताना त्याचीही अनेकांनी मजा घेतली आहे.
भारतीय पुरुष संघाने ब्राँझपदकापर्यंतच्या प्रवासात विविध संघांना पराभूत केले किंवा काही सामन्यात भारतीय संघालाही हार मानावी लागली. भारतीय महिलांना नमविणाऱ्या संघांना या पुरुष संघाने नमविले. तिथे महिला संघाने आपल्या देशाच्या पुरुष संघाला नमविणाऱ्यांना आपला हिसका दाखविला.
हे ही वाचा :
गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान
‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक
भारतीय महिलांना जर्मनीविरुद्ध २-० अशी हार मानावी लागली होती. त्याचा वचपा पुरुषांनी जर्मनीविरुद्धच्या ब्राँझपदकाच्या सामन्यात ५-४ असा विजय मिळवून घेतला. महिलांना ब्रिटनविरुद्ध ४-१ अशा फरकाने हार पत्करावी लागली होती. तर भारताच्या पुरुष संघाने ब्रिटनवर ३-१ असा विजय मिळविला. महिला संघाला अर्जेंटिनाने २-१ असे नमविले पण भारतीय पुरुषांनी अर्जेंटिनाला ३-१ असे पराभूत करत परतफेड केली. मुलींनीही मग पुरुष संघाला मदत केली. पुरुषांना ऑस्ट्रेलियाने ७-१ असे झोडपले होते पण मुलींनी ऑस्ट्रेलियावर १-० अशी मात करत त्याचा जणू बदलाच घेतला.
भारताच्या या दोन संघांनी केलेल्या या कामगिरीची अशी ही गंमत.
दोन्ही संघ या ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दमदार कामगिरी करत आहेत. त्यामुळेच भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होते आहे.