टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा सराव सामना रद्द झाल्यामुळे आता भारतीय संघाला थेट तयारी करायची आहे ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना होत आहे, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.
पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळविला होता. त्यात मोहम्मद शमीने अखेरच्या आणि त्याच्या एकमेव षटकात ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद केले आणि भारताला हा रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्याकडे भारताचे लक्ष होते, पण पण न्यूझीलंडविरुद्धची ही लढत रद्द झाली. पावसामुळे हा सामना होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. ब्रिस्बेनमध्ये ही लढत होणार होती. ब्रिस्बेनमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला.
त्यामुळे भारत – न्यूझीलंड लढत होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. पाऊस थांबला असता तर सामना सुरू करणे शक्य झाले असते पण पाऊस कोसळत राहिल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला. दरम्यान, पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी होणारा सराव सामनाही रद्द करण्यात आला. तिसरा सामना रद्द झाला तो म्हणजे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका. पावसामुळे या सामन्यावरही अनिश्चिततेची टांगती तलवार होती. अखेर तो सामनाही रद्द झाला.
हे ही वाचा:
“मशाल’ अखेर उद्धव ठाकरेंच्याच हाती
ड्रग्स तस्करीत नायजेरियन करताहेत भारतीय महिलांचा वापर
‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’
भास्कर जाधवांच्या घरावर दगड, स्टम्प, बाटल्या फेकल्या
भारताला आता टी-२० वर्ल्डकपमधील थेट लढतीत खेळायचे आहे. हा सामना २३ ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे. सराव सामना रद्द झाल्यामुळे भारताची आणखी तयारी करण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटचाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ऐन दिवाळीत ही लढत असल्यामुळे फटाके कोण फोडणार याबद्दल क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.