केंद्र सरकारने देशातील मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह मधाच्या उत्पादनाच्या वाढीकडेही विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मध निर्यातीत चांगली वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये देशातून मधाच्या निर्यातीचे प्रमाण वाढले असून २०२०-२१ मध्ये देशातून ५९ हजार ९९९ मेट्रिक टन मधाची निर्यात करण्यात आली आहे. भारतातून जगभरातील पन्नास देशांमध्ये मधाची निर्यात करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त मधाची निर्यात होते.
२०१३- १४ मध्ये भारताकडून २८ हजार ३७८.४२ मेट्रिक टन मधाची निर्यात झाली होती. त्यात लक्षणीय वाढ होऊन २०२०- २१ मध्ये देशातून ५९ हजार ९९९ मेट्रिक टन मधाची निर्यात झाली. त्यातून ९६.७७ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे (७१६ कोटी) उत्पन्न देशाला मिळाले आहे. भारतातील मध मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात केला जातो, अशी माहिती कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपिडा) संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अमेरिकेसोबतच सौदी अरेबिया, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि युरोपातील देश अशा एकूण ५० देशांमध्ये मधाची निर्यात केली जाते.
हे ही वाचा:
…त्यांच्या जाळ्यात गावले दीड कोटी!
टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात
स्थानिक बाजारपेठेतही मधाला मोठी मागणी आहे. मधाच्या आरोग्य उपयुक्ततेबाबत आयुष मंत्रालयाने माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे कोरोना काळातही मधाला मोठी मागणी होती. मधाची निर्यात येत्या काळात वाढत राहणार, असे मध उत्पादक प्रशांत सावंत यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध मोहीम या योजना पुढील दोन वर्षांसाठी राबवण्यात येणार आहेत. मधुक्रांती किंवा राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मधमोहीम ही योजना २०१७- १८ मध्ये सुरुवात झाली. या योजनेमध्ये मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन मधमाशांच्या वसाहती मध उत्पादकांना पुरवण्यात येतात.