भारतीय संघाने ३-० खिशात घातली मालिका

भारतीय संघाने ३-० खिशात घातली मालिका

रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेवर कब्जा केला आहे. ३-० अशी मालिका खिशात घालत भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला व्हाईटवॉश दिला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धची मालिका वाईट पद्धतीने गमावल्यानंतर भारतीय संघाचा हा विजय सर्व खेळाडूंचे मनोधैर्य वाढवणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या सामन्यात चार बदल करत नव्या खेळाडूंना संधी देण्याचे ठरवले. ज्यामध्ये सलामीवीर शिखर धवन, फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि मधल्या फळीतील युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. गेल्या काही काळापासून भारतीय संघाची फलंदाजी हा एक चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. त्यामुळे फलंदाजीवर जास्त काम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांचा भाजपकडून पुण्यातल्या त्याच पायऱ्यांवर सत्कार

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?

‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’

पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली

भारतीय संघाचे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. विराट कोहलीला तर आपले खातेही उघडता आले नाही. पण अशा परिस्थितीत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला चौथ्या विकेटसाठी त्यांनी ११० धावांची भागीदारी रचली. पण त्या नंतर ऋषभ पंतने ५६ धावा करत आपले अर्धशतक साजरे केले तर श्रेयस अय्यर देखील ८० धावांची अर्धशतकी खेळी करून बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (३३) आणि दीपक चहर (३८) या दोघांनी अष्टपैलू कामगिरीची चमक दाखवली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने धावफलकावर २६५ धावा चढवल्या.

२६६ चे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेला वेस्ट इंडीज संघ भारतीय गोलंदाजीसमोर पुरते ठेपाळलेला पाहायला मिळाला. कर्णधार निकोलस पुरन (३४) आणि अष्टपैलू खेळाडू ओडिन स्मिथ (३६) या दोघांचा अपवाद वगळता एकाही कॅरेबियन खेळाडूला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. १६९ धावातच वेस्ट इंडीजचा पूर्ण संघ माघारी परतला आणि भारतीय संघाने ९६ धावांनी विजय नोंदवला. आता हे दोन्ही संघ कोलकात्याला रवाना होणार असून तिथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

Exit mobile version