भारतीय संघ आज आपला एक हजारावा एकदिवसीय सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजयावर शिकामोर्तब केले. भारताने हा सामना सहा गडी राखत जिंकला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत वेस्ट इंडीजचा डाव १७६ धावांमध्ये गुंडाळला. मोहम्मद सिराज याने वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला. त्यानंतर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिरकीसमोर वेस्ट इंडीजच्या संघाने गुडघे टेकले. या दोन्ही फिरकीपटूंनी इंडीजचा अर्ध्याहून अधिक संघ तंबूत धाडला. चहल याने ४९ धावा देत चार गडी बाद केले तर वॉशिंग्टन याने नऊ षटकात ३० धावा देत तीन गडी माघारी धाडले. प्रसिद क्रिष्णा याने दोन गडी बाद केले. वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ७१ चेंडूत ५७ धावा केल्या. मात्र, इतर खेळाडूंकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे वेस्ट इंडीजचा डाव १७६ वर आटोपला.
वेस्ट इंडीजने उभ्या केलेल्या लक्ष्याला गाठताना भारतीय सलामी जोडीने दमदार कामगिरी करत पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्मा याने ५१ चेंडूत ६० धावा केल्या. त्याच्यानंतर मैदानात उतरलेला विराट कोहली चार चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने आठ धावा करुन बाद झाला. इशान किशन हा २८ धावा करून बाद झाला तर रिषभ पंत हा देखील ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी भारताचा डाव सावरत संघाला यश मिळवून दिले. सुर्यकुमार याने ३६ चेंडूत २४ धावा केल्या तर दीपक याने ३२ चेंडूत २६ धावा केल्या.
हे ही वाचा:
….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर
लता दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
हृदयाची तार छेडणारा तारा निखळला
लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा
भारताचा आजचा हा ऐतिहासिक सामना होता. भारतीय संघ आज त्यांचा एक हजारावा एकदिवसीय सामना खेळला. एक हजार एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला होता. या सामन्यात विजय मिळवून भारताने आघाडी घेतली आहे.