भारताचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट राखून विजय

तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला

भारताचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट राखून विजय

भारत आणि वेस्ट इंडिजमधील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने पाच विकेटने जिंकला. या विजयामुळे भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. नुकताच भारताने कसोटी मालिकेतही १-० ने विजय नोंदवला होता. तर, दुसरीकडे वेस्ट इंडिज आपल्या खेळात बदल करत असूनही त्याचे परिणाम दिसलेले नाहीत. विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलेला वेस्ट इंडिजचा संघ ताज्या दमाने भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरला होता. मात्र, त्यांचा संघ २३ षटकांत केवळ ११४ धावाच करू शकला. भारताने २२.५ षटकांत पाच विकेट गमावून ११८ धावा करत वेस्ट इंडिजवर मात केली.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने गोलंदाजीची सुरुवात केली तर, दुसऱ्या बाजूने मुकेशनेही नवा चेंडू सांभाळला. मुकेशने त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातले पहिले षटक निर्धाव दिले. त्यानंतर हार्दिकने त्याच्या दुसऱ्या षटकांत काइल मेयर्सला तंबूत पाठवले. ब्रेंडन किंग आणि एलिक अथानाज यांनी ३८ धावांची भागिदारी केली, मात्र मुकेश कुमारने अथानाजला बाद केले.

खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत होती, तरीही वेस्ट इंडिजचे फलंदाजही खेळपट्टीवर तग धरून राहण्यात अपयशी ठरले. किंगसुद्धा १७ धावा करून शार्दुलच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर फिरकीपटूंनी सूत्रे हाती घेतली. रवींद्र जडेजाने शिमरन हेटमायर, रोमारियो शेफर्ड आणि रोवमॅन पॉवेलला बाद केले. या दरम्यान कर्णधार शाई होप एक बाजू समर्थपणे सांभाळत होता. मात्र, त्याला अन्य कोणत्याही सहकाऱ्याने साथ दिली नाही. वेस्ट इंडिजचे सर्व फलंदाज विकेट फेकून बाद झाले.

वेस्ट इंडिजचे सहा गडी बाद झाल्यावर रोहित शर्मा याने कुलदीप यादव याच्याकडे चेंडू सोपवला आणि त्यांनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत वेस्ट इंडिजच्या अखेरच्या फलंदाजांना तंबूची वाट धरायला लावली. कुलदीपने चारही विकेट घेतल्या. अखेर शाई होपही कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला. होपने त्याच्या संघासाठी सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्याशिवाय अथानज २२, किंग १७ आणि हेटमायर हे फलंदाज दोन आकडी संख्या गाठू शकले. वेस्ट इंडिजचे सात फलंदाज १० आकडाही गाठू शकले नाहीत.

कुलदीप, जाडेजाचा विक्रम

रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप आणि जडेजा यांनी वेगळा इतिहास घडवला. भारताच्या दोन डाव्या फिरकीपटूंनी कोणत्याही एकदिवसीय सामन्यात सात विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर आणि मुकेश ठाकूर यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

११५ चे लक्ष्य गाठताना पाच विकेट गमावल्या

११५ धावांचे सोपे लक्ष्य गाठण्यासाठी रोहित शर्मा याने शुभमन गिल आणि ईशान किशन या सलामीवीरांची जोडी पाठवली. मात्र, गिल या सामन्यातही खास कामगिरी करू शकला नाही. तो सात धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमारही १९ धावा करून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेला हार्दिक चांगली फलंदाजी करत होता. मात्र तोही बाद झाला. ईशान किशनच्या बॅटला लागून उडालेला चेंडू गोलंदाजाच्या हाताला लागून स्टॅम्पला लागला अन् हार्दिकला तंबूत परतावे लागले.

हे ही वाचा:

इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक

विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं

महिला अत्याचाराविरोधात केंद्र सरकारचे ‘झिरो टॉलरेंस’ धोरण

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी

पाचव्या क्रमांकावर आलेला जडेजा १६ धावा करून नाबाद राहिला. मात्र ईशान किशन ५२ धावा करून बाद झाला. सहाव्या क्रमांकावर आलेला शार्दुलही एक धाव करून बाद झाला. अखेर रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने १२ धावा करून चौकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या पाच विकेट जाऊनही विराट कोहली फलंदाजीला आला नाही. जर त्यांना फलंदाजीला यावे लागले असते तर, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची ही त्याची पहिलीच वेळ असती. वेस्ट इंडिजच्या गुदाकेश मोती याने दोन आणि जायडेन सेल्स-यानिक करिआह याने प्रत्येकी एकेक गडी बाद केले.

Exit mobile version