भारताच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ठोकलेली अर्धशतके आणि रवींद्र जाडेजा व मोहम्मद सिराज यांनी घेतलेले प्रत्येकी तीन बळी या जोरावर भारताने नेपाळचा पराभव करून २०२३च्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४मध्ये धडक दिली. आता १० सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.
नेपाळचा हा भारताविरोधात पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. नेपाळच्या फलंदाजांनी २३० धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते.
रोहित शर्माने त्याचे ४९वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आणि विराट कोहलीच्या (१०४६) धावांना मागे टाकून आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही रोहित आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितचा सलामीचा जोडीदार शुभमन गिल यानेही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सातवे अर्धशतक ठोकले. रोहित ७४ धावांवर नाबाद होता तर गिलने विजयी धावा केल्या, भारताने २१व्या षटकातच आव्हान पूर्ण केले. गिलने ६७ धावा केल्या.
तत्पूर्वी, रवींद्र जडेजाने ४० धावांत तीन विकेट घेऊन आशिया चषकमध्ये भारतासाठी प्रमुख विकेट घेणाऱ्या इरफान पठाण याच्याशी बरोबरी केली. खराब सुरुवात करणाऱ्या मोहम्मद सिराजनेही तीन गडी बाद केले. खेळादरम्यान दोन वेळा पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला २३ षटकांत १४५ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. भारताने धावांचा पाठलाग सुरू केला तेव्हा पहिल्याच षटकात रोहित शर्माला करण केसीने सतावले, परंतु सोमपाल कामीच्या दुसऱ्याच षटकात शुभमन गिलने तीन चौकार मारून आपला इरादा जाहीर केला.
पावसाच्या विश्रांतीनंतर, भारताकडे सक्रिय होण्याशिवाय पर्याय नव्हता. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने तडाखेबंद फलंदाजी केली. त्यामुळे भारताने नऊ षटकांत बिनबाद ६१ धावांपर्यंत मजल मारली. भारतासाठी हा विजय सोपा नव्हता. भारताच्या वेगवान गोलंदाजांना संघर्ष करावा लागला, क्षेत्ररक्षणही ढिसाळ होते. नेपाळचे फलंदाज खेळपट्टीवर असताना भारतीय खेळाडूंची देहबोलीही निराशाजनक होती. अखेर, मोठ्या सामन्यातील अनुभवाच्या अभावामुळे नेपाळला पराभवाचा स्वीकार करावा लागला.
सुरुवातीला रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेपाळच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी पहिल्या पाच षटकांत तीन झेल सोडल्यानंतर आसिफ शेख आणि कुशल भुर्तेल यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. कुशल भुर्तेल चांगल्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजीविरुद्ध प्रभावी ठरला. भुर्तेलने तीन चौकार आणि दोन षटकार खेचून नेपाळला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही अविस्मरणीय क्षण दिले. शार्दुल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात कुशल भुर्तेलची विकेट घेतली पण तोपर्यंत नेपाळने १०व्या षटकात ६५ धावांची मजल मारली होती.
हे ही वाचा:
जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत
खिचडी घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
नेपाळला आसिफ शेख (५८) व सम्पल कामी (४८) यांच्या खेळीमुळे धावसंख्येत द्विशतकी आकडा गाठता आला. त्यांना कुशल भुर्तेल (३८) व दिपेंद्र सिंह (२९) यांची साथ लाभली.