आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ मध्ये तीन वेळच्या विजेत्या भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी जपानला ५-० ने पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताचा सामना शनिवारी मलेशियाशी होणार आहे.
चेन्नईच्या राधाकृष्णन स्टेडियमवर हा उपांत्य फेरीचा सामना रंगला. दोन्ही संघ प्रत्येक सेकंदाला मैदानावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झगडत होते. जपानने तीव्र बचाव केल्यामुळे पहिले सत्र शून्य बरोबरीतच संपले. मात्र, पहिल्या सत्रानंतर भारतीयांनी जपानविरुद्ध वर्चस्व राखले.
भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोल करीत सामन्याचा निर्णय जणू स्पष्ट केला. या सत्रात हरमप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका पाहून हॉकी तज्ज्ञांनी रॉकेट शॉट असे याचे वर्णन केले. १९व्या मिनिटाला आकाशदीपने पहिला गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतने आणखी एका पेनल्टी कॉर्नरचे कोणतीही चूक न करता गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे सामना अर्धा होईपर्यंत भारताने २-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर मनप्रीतने अप्रतिम गोल केल्याने भारताने ३-० अशी आघाडी वाढवली. जणू काही गोलपोस्ट मैदानाच्या एका बाजूला सरकले होते, अशी परिस्थिती होती.
जेव्हा सामना अर्धा संपल्याची शिटी वाजली, तेव्हा भारताच्या दमदार कामगिरीचा आणि सामन्यावरील निर्विवाद नियंत्रणाचाच जणू तो गजर होता. तिसरे सत्र सुरू होताच खेळ आणखी रंगत गेला. मनप्रीत उजव्या बगलेतून चेंडू वेगाने घेऊन जात होता. सुमित गोलक्षेत्राच्या नजीक आहे, हे पाहिल्यावर मनप्रीतने बचावपटूंमधून चेंडू वेगाने पास केला. सुमितने एका बचावटूस गुंगारा दिला आणि त्याच ओघात चेंडू गोलजाळ्यात धाडला.
हे ही वाचा:
भाजपा नेत्या सना खान हत्येप्रकरणी आरोपीला अटक
स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका
‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव
शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा
सुमितने सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला आश्चर्यकारक गोल केला आणि भारताची आघाडी ४-० अशी वाढवली. त्यानंतर शेवटच्या सत्रात कार्तीने ५१ व्या मिनिटाला गोल केला आणि भारताने तब्बल ५-० अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धात जपानचा संघ प्रतिकारही करणार नाहीत, याची काळजी भारतीयांनी घेतली. जपानच्या संघाने बऱ्यापैकी गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. श्रीजेशच्या तीनशेव्या सामन्यात भारतीयांनी गोल न स्वीकारण्याची हॅटट्रिक केली.