भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने पाच विकेट्स राखत इंग्लंडवर विजय मिळवत मालिका आपल्या खिशात टाकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. युवा खेळाडूंनी या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५३ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर गारद झाला. पहिल्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वाल याने ११७ चेंडूत ७३ धावा ठोकल्या तर शुभमन गिल याने ६५ चेंडूत ३८ धावा केल्या. याशिवाय भारताचा डाव सावरला युवा खेळाडू ध्रुव जुरेलने. त्याने १४९ चेंडूत ९० धावा जोडल्या. विशेष म्हणजे भारताचा कुलदीप यादव याने त्याला उत्तम साथ दिली. १३१ चेंडूत त्याने २८ धावा केल्या. पहिल्या डावात रवींद्र जाडेजा याने इंग्लंडचे चार गडी बाद केले तर इंग्लंडकडून बाशीर याने सर्वाधिक पाच बळी घेतले.
भारतीय संघ ३०७ धावांवर सर्वबाद झाल्यावर इंग्लंडकडे पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी होती. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात केवळ १४५ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविचंद्रन अश्विन याने पाच तर कुलदीप यादव याने चार गडी बाद करून भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या.
दुसऱ्या डावात जुरेलच्या बॅटमधून विजयी धावा आल्या. त्याने दोन धावा घेत सामना जिंकून दिला. जुरेल ३९ धावांवर नाबाद राहिला आणि शुभमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून बाशीरने पुन्हा तीन विकेट्स घेतल्या.
हे ही वाचा:
गुजरात मानवी तस्करी प्रकरणातील ‘डर्टी हॅरी’ला अमेरिकेत अटक
दारिद्र्यपातळी लक्षणीयरीत्या ५ टक्के खाली
राष्ट्रीय लोकदलाच्या हरयाणा अध्यक्षाची गोळी झाडून हत्या!
मराठा आंदोलन: मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद!
चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. भारताला ८४ धावांवर पहिला धक्का जैस्वालच्या बाद होण्याच्या रुपात बसला. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून तंबूत परतला होता. रजत पाटीदार आणि रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकले नाहीत. सर्फराज यालाही या डावात फार चमकदार कामगिरी करता आली नाही. यानंतर जुरेल आणि शुभमनने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी स्ट्राईक रोटेट करत भारताला विजयाकडे नेले. भारतीय संघाच्या या विजयात शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मोलाचे योगदान दिले.